प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या एका परीक्षेच्या तपासणीत घोडचूक झाल्याचे समोर आले आहे. वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पारदर्शकता नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये वर्णनात्मक पद्धतीने होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा (राज्यसेवा परीक्षा) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आयोगाने २०२३मध्ये ‘निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गट-ब’ची मुख्य परीक्षा घेतली. त्यात कमी गुण मिळाल्यामुळे उत्तरपत्रिकेची प्रत मिळावी, यासाठी काही विद्यार्थ्यांनी माहिती अधिकारांतर्गत आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र, आयोगाने प्रत न दिल्याने काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मिळाली. मात्र, उत्तरपत्रिकेची तपासणी केल्यानंतर गुण देताना भेदभाव झाल्याचे आढळले. एका प्रश्नाच्या समान उत्तरासाठी एका विद्यार्थ्याला गुण दिले; तर दुसऱ्या विद्यार्थ्याचे उत्तर चुकीचे ठरविले आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘‘बरोबर उत्तर लिहिल्यानंतर एका विद्यार्थ्याला गुण दिले आणि दुसऱ्याचे उत्तर चुकीचे ठरविले. माहिती अधिकारामध्ये केवळ दोन पेपर मिळाले. त्यातून ही बाब समोर आली. अन्नसुरक्षा अधिकारी परीक्षेचे साधारण तीन हजार विद्यार्थ्यांचे सहा हजार पेपर आणि अभियांत्रिकी परीक्षेच्या साडेसहा हजार विद्यार्थ्यांच्या साधारण १३ हजार पेपरबाबत आयोगाने चुका केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या उत्तरपत्रिकांचीही तपासणी व्हावी. वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी आयोगाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे.’’
या संदर्भात आमच्याकडे अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. वर्णनात्मक पद्धतीने पेपर घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार तज्ज्ञ व्यक्तींनी पेपर तपासले आहेत. विद्यार्थ्यांना काही आक्षेप असतील, तर त्यांनी आयोगाकडे तक्रार करावी.
डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
वर्णनात्मक परीक्षेत अशी घोडचूक होऊ शकते, याची कल्पना होती. पेपर तपासणीसाठी आयोगाकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे निकालासाठी लागणारा वेळ आणि गुणांमधील असमानता, यामुळे वर्णनात्मक परीक्षेला विरोध होत आहे. आयोगाने वर्णनात्मकऐवजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घ्यावी.
स्पर्धा परीक्षा उमेदवार