नेरूळ, ता. १० (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानकात भाजीविक्रेते, फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे परिसराला बकालपणा आला आहे. दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात, शिवाय ट्रान्स हार्बरची लोकल सेवा या स्थानकातून असल्याने सकाळ-संध्याकाळ प्रवाशांची मोठी गर्दी असते; मात्र या स्थानकाच्या दोन्ही बाजूला, स्थानकाच्या पुलावर भाजी विक्रेते, खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच अन्य व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होते. एखादी लोकल पकडताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते, शिवाय भाजीपाल्याचा कचरादेखील स्थानकात पडून असतो. सफाई कर्मचाऱ्यांकडून स्थानकाची योग्य स्वच्छता करण्यात येत नाही. त्यामुळे नेहमी घाणीचे साम्राज्य असते, शिवाय दुर्गंधीदेखील येत असते. नवी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून भिकाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश दिसून येतो. हे भिकारी रेल्वे स्थानक परिसर, सिग्नल, मॉलच्या बाहेर, तसेच गर्दी असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानाबाहेर मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
----------------
उड्डाणपुलांखाली भिकाऱ्यांचा संसार
कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरूळ, सानपाडा, सीवूड्स आदी ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली बेघरांनी व भिकाऱ्यांनी आपला संसार थाटला आहे. नेरूळ रेल्वे स्थानकातील पार्किंगमध्येही त्यांनी आपले बस्तान मांडले आहे. या भागात ते अस्वच्छता पसरवण्यासोबतच भांडणे व लहान-मोठे गुन्हे करत नेरूळ रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवर येणाऱ्या प्रवाशांकडे पैसे मागत त्यांना हैराण करत आहेत. अनेकदा पैसे न देणाऱ्या प्रवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करतात.
-------------
महिलांमध्ये भीतीचे वातावरण
रेल्वे स्थानकामध्ये भिकारी, गर्दुल्ले यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. रेल्वे स्थानक परिसर व पदपथ म्हणजे त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी झोपण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे महिलावर्गामध्ये रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण असते. अनेक वेळा स्थानकामध्ये रात्रीच्या वेळी जुगारदेखील खेळला जातो. त्यामुळे पालिका व सिडको प्रशासनाने याला आळा घालावा, अशी मागणी येथील प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
-------------------
नवी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी वावर असणाऱ्या भिकाऱ्यांवर पोलिस, तसेच महापालिकेच्या सहकार्याने वेळोवेळी कारवाई केली जाते. अशा घटकांची रवानगी भिक्षेकरी स्वीकार केंद्रात केली जाते. भिकाऱ्यांचा वावर असणाऱ्या रेल्वे स्थानक, बस स्टॅन्ड आणि उड्डाणपुलाच्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले जातील.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक पोलिस
-----------------
मी दररोज नेरूळ रेल्वे स्थानकातून प्रवास करते. स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे, भाजीविक्रेत्यांचे, तसेच खाद्यपदार्थ स्टॉलचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे परिसरात नेहमी अस्वच्छता दिसून येते. भिकाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रात्रीच्या वेळी येथून प्रवास करताना भीती वाटते.
- वैष्णवी हुले, विद्यार्थिनी