Beed Crime : धसांच्या नंतर संदीप क्षीरसागर अडचणीत? तहसीलदाराला धमकावलं, 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल
Saam TV March 11, 2025 06:45 AM

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडच्या मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरले. दरम्यान सतीश भोसले प्रकरणामुळे सुरेश धस काहीसे अडचणीत असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला संदीप क्षीरसागर एका कथित ऑडिओ क्लिपमुळे कचाट्यात सापडले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार यांनी बीडमधील नायब तहसीलदारांना दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये क्षीरसागर हे तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्रामरोजगार सेवकाबद्दल तक्रार दाखल करुन नका म्हणत असल्याचे ऐकायला मिळते. बोलण्यावरुन ते तहसीलदारांना धमकावत आहेत असे वाटते.

संदीप क्षीरसागर आणि तहसीलदार यांच्यातील संभाषण -

सुरेंद्र डोके तहसीलदार - हॅलो साहेब नमस्कार.

संदीप क्षीरसागर - पीए सर नमस्ते नमस्ते भैया साहेब बोलणार आहेत.

सुरेंद्र डोके तहसीलदार - नमस्कार साहेब.

संदीप क्षीरसागर - डोके साहेब उंब्रद खालसाच्या विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली?

सुरेंद्र डोके तहसीलदार - साहेब त्याची तक्रार आली होती.

संदीप क्षीरसागर - कशाची तक्रार त्याची सही बीयी काही नाही.

सुरेंद्र डोके तहसीलदार - त्यात सुनावणी घेतो आणि पुढची प्रोसेस करतो.

संदीप क्षीरसागर - एक तर तुम्ही माझ्या मतदारसंघात चार्ज मला न विचारता घेतला आहे.

सुरेंद्र डोके तहसीलदार - साहेब त्याच्यात तक्रार आली होती त्याची चौकशी करावी लागेल.

संदीप क्षीरसागर - एक तर तुम्ही चार्ज मला न विचारता घेतला आहे. सहा महिन्यात सरकार आलं तर तू कुठेही असला तर सोडणार नाही सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नकोस.

सुरेंद्र डोके तहसीलदार - साहेब चौकशी करतो प्रोसेस करून घेतो ना.

संदीप क्षीरसागर - तुझे नाटक मीच बघेल बरं का कुठेही गेला तरी महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही ना तू आ... या विषयात रोजगार सेवकाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे.. बर का...

सुरेंद्र डोके तहसीलदार - करून घेतो.. करून घेतो..

दरम्यान हा प्रकार २०२३ च्या जुलै महिन्यात घडला असून तेव्हाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

(साम टी.व्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.