विरार : विरारमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात तीन महिन्याच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या महिलेला मांडवी पोलिसांनी बिहार (Bihar) राज्यातून अटक केली आहे. तर यातील बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून हा गुन्हा उघडकीस आणण्यात मांडवी पोलिसांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, विरारच्या (Virar Crime News) नालेश्वरनगर येथे राहणारे नबीउल्लाह चौधरी (वय 38) यांचा तीन महिन्यांचा मुलगा 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास अपहरणाला बळी पडला. त्यांच्या मेव्हण्याची पत्नी किताबुननिशा हिने खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाते, असे सांगून बालकाला पळवले. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान बालक आईच्या अंगावर दूध पिण्याच्या वयातील असल्याने, हा गंभीर गुन्हा असल्याचे लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी विशेष तपास पथक तयार केलं होतं.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता, आरोपी महिला बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील सरमेरा परिसरात असल्याचे निष्पन्न झालं. मांडवी पोलिसांचे विशेष पथक तत्काळ बिहारला रवाना झाले. स्थानिक नालंदा पोलीस आणि तांत्रिक विश्लेषण टीमच्या मदतीने बिहार-झारखंड सीमावरील सूर्यचक, मिरनगर आणि सरमेरा गावातील अनेक घरांची तपासणी करण्यात आली. या शोधमोहीमेत अखेर आरोपी महिलेला ताब्यात घेत पोलिसांनी तीन महिन्याच्या बालकाची सुखरूप सुटका केली. आरोपी महिलेला बिहारहून विरारच्या मांडवी येथे आणण्यात आले असून, तिला अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात आरोपी महिलेला पती आणि तीन मुले असूनही तिचे बिहारमधील सरमेरा गावातील एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या प्रियकराला कधीच विवाह आणि मुलांची माहिती दिली नव्हती. आपले प्रेमसंबंध कायम राहावेत यासाठी तिने प्रियकराला गरोदर असल्याची खोटी माहिती दिली आणि व्हिडिओ कॉलद्वारे नणंदेच्या तीन महिन्याच्या बाळाला स्वतः चे अपत्य असल्याचे भासवले. पुढे, प्रियकरासोबत नव्याने संसार करण्याच्या हेतूने तिने नणंदेच्या मुलाचे अपहरण केले आणि बालकासह बिहारला पळ काढला. मांडवी पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे तीन महिन्याच्या निष्पाप बालकाची सुखरूप सुटका करुन आईच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणात मांडवी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..