मधुमेह... संपूर्ण जगाला भेडसावणारी सध्याची एक गंभीर समस्या. विशेषत: भारतामध्ये, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
मधुमेह (Diabetes) एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराला आवश्यक इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी किंवा पूर्णपणे बंद होऊ शकते. यामुळं शरीरात साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकत नाही. त्यामुळं विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.
इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा इन्सुलिन प्रतिरोधची हल्ली बरीच चर्चा होत असते. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर याबाबत बरंच काही लिहिलं आणि वाचलं जात आहे.
इन्सुलिन रेझिस्टन्सवर पुस्तकंही बऱ्याच प्रमाणात येत आहेत, व्हीडिओ बनवले जात आहेत. यात एखादा खास व्यायाम आणि आहारानं हे संतुलित करण्याचा दावाही केला जातो.
इन्सुलिनच्या प्रतिरोधामुळे टाइप 2 मधुमेहासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात, यामुळं लोक याकडं सध्या जास्त लक्ष देताना दिसत आहेत.
अशावेळी इन्सुलिन रेझिस्टन्स समजून घेणं गरजेचं आहे. इन्सुलिन प्रतिरोध कसा होतो? याची लक्षणं काय आहेत? यातून बरं होता येतं का?
उपवासामुळे त्यावर नियंत्रण ठेवता येतं का?
इन्सुलिन हा पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडात तयार होणारा एक महत्त्वाचा संप्रेरक (Hormone) आहे. हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचं काम करतं.
जर स्वादुपिंड खूप कमी इन्सुलिन तयार करत असेल किंवा शरीर इन्सुलिनचा वापर योग्यपद्धतीनं करत नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
शरीरात इन्सुलिन असं काम करतं...
इन्सुलिन प्रतिरोध किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स ही एक गुंतागुतांची प्रक्रिया आहे. जेव्हा स्नायू, चरबी आणि यकृत पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा असं होतं.
यामुळं, पेशी रक्तातील ग्लुकोज प्रभावीपणे शोषून घेणं किंवा साठवणं थांबवतात.
यामुळं रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होत नाही. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करतं. या स्थितीला हायपरइन्सुलिनमिया म्हटलं जातं.
जोपर्यंत पॅनक्रियाज कमकुवत पेशींच्या प्रतिसादावर मात करण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करते, तोपर्यंत ब्लड शुगर लेव्हल म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत राहते.
त्याच वेळी, इन्सुलिनच्या दिशेनं पेशींचा प्रतिकार वाढल्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील वाढते. रक्तातील ग्लुकोजच्या वाढीमुळे टाइप 2 मधुमेहासह इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे सल्लागार फिजिशियन आणि एंडोक्राइनोलॉजी, मधुमेह आणि इंटर्नल मेडिसिनचे तज्ज्ञ फ्रँकलिन जोसेफ म्हणतात की, इन्सुलिन प्रतिरोध ही एक जटिल स्थिती आहे, जी अनुवांशिक, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांनी प्रभावित होत असते.
इन्सुलिन रेझिस्टन्सची कारणं व्यक्तीनुसार बदलू शकतात.
आठ कारणांमुळं वाढते इन्सुलिनची प्रतिरोधकताफ्रँकलिन जोसेफ हे डॉ. फ्रँक्स वेट लॉस क्लिनिकचे संस्थापकही आहेत. ते म्हणतात की, इन्सुलिन रेझिस्टन्स अनेक कारणांमुळं होऊ शकतो.
1. लठ्ठपणा: लठ्ठपणा, विशेषत: ओटीपोटाची चरबी, थेट इन्सुलिनच्या प्रतिकाराशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.
2. कमी शारीरिक श्रमः नियमितपणे शारीरिक श्रम न केल्यानेही इन्सुलिन प्रतिरोधचा धोका वाढू शकतो.
3. अनुवांशिकताः काही लोकांमध्ये अनुवांशिकतेने इन्सुलिन रेझिस्टन्सची प्रवृत्ती दिसून येते.
4. खराब आहार: प्रक्रिया केलेले अन्न, शुद्ध कर्बोदकं आणि भरपूर साखरयुक्त आहार घेतल्यास इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो.
अशा आहारामुळं रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वेगानं वाढू शकतं, ज्यामुळं इन्सुलिनचं उत्पादनही वाढू शकतं.
5. सतत तणावात राहणं: कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचं नियमन करण्याच्या इन्सुलिनच्या क्षमतेमध्ये अडथळे आणू शकतात, ज्यामुळं इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो.
6. झोपेची समस्याः कमी झोप किंवा झोपेच्या समस्येमुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम होऊ शकतो. इन्सुलिन संवेदनशीलता शरीराच्या पेशी रक्तात सापडलेल्या ग्लुकोजचा किती चांगल्या प्रकारे वापर करतात हे सांगते.
झोपेच्या कमतरतेमुळं शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडू शकते, ज्यामुळं इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या निर्माण होऊ शकते.
7. काही वैद्यकीय अडचणी: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), कुशिंग सिंड्रोम आणि फॅटी लिव्हर आजारातही इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका असतो.
8. वाढतं वयः वाढत्या वयामुळं मनुष्याच्या शरीरातील पेशींचा प्रतिसाद कमी होऊ शकतो. त्यामुळं इन्सुलिन प्रतिरोधाचा धोका वाढतो.
या बातम्याही वाचा:
रमजानच्या महिन्यात अनेक मुस्लिम समुदाय सकाळ ते सायंकाळपर्यंत उपवास करतात. 'डायबिटीज यूके' ही धर्मादाय संस्था आरोग्याच्या समस्या भेडसावत असलेल्या लोकांना सावध राहण्याचा सल्ला देते.
युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बर्मिंगहॅम येथील डायबेटिस, एंडोक्रिनोलॉजीचे प्रोफेसर आणि डायबेटिसचे क्लिनिकल डायरेक्टर प्रोफेसर वसीम हनीफ म्हणतात की, "मधुमेह असताना उपवास करणं धोकादायक ठरू शकतं.
यामुळं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांनी मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपवास करणं फार महत्वाचं आहे."
डॉ. फ्रँकलिन जोसेफ म्हणतात की, काही अभ्यासानुसार, उपवासामुळं इन्सुलिन प्रतिरोधक आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमधील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते.
उपवासादरम्यान काही लोकांचं वजन कमी होऊ शकते किंवा शरीरातील चरबीमध्ये काही बदल होऊ शकतात. या सर्वाचा इन्सुलिनच्या संवेदनशीलता आणि चयापचयवर (Metabolism) परिणाम होऊ शकतो. विशेषतः लठ्ठ लोकांना याचा सामना करावा लागतो.
फ्रँकलिन जोसेफ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीवर उपवासाचे वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. इन्सुलिन संवेदनशीलता आणि चयापचयावर उपवासाचा काय परिणाम होईल, हे त्या व्यक्तीचं वय, लिंग, आरोग्य, आहार आणि त्या व्यक्तीच्या शारीरिक हालचाली यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतं.
ते म्हणतात, "मधुमेह आणि चयापचयाची इतर समस्या असलेले आणि रमजानमध्ये उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपवास करावा."
"तुम्ही अधूनमधून उपवास करत असाल किंवा रमजानचे उपवास करत असाल, चांगल्या खाण्याच्या सवयी अंगीकारणं फार महत्वाचं आहे," असं अम्मान येथील न्यूट्रिशनिस्ट रीम अल-अब्दलत यांनी चांगल्या आरोग्यासाठी सांगितलं.
इन्सुलिनच्या रेझिस्टन्सचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अधूनमधून उपवास (Intermittent Fasting) करणं फायदेशीर आहे का?इंटरमिटंट फास्टिंगनं जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरेच डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ यामुळं होणाऱ्या फायद्यांबद्दल बोलत आहेत.
यात दीर्घ काळापर्यंत उपाशी राहणं, कमी वेळा खाणं, आठवड्यातून एकदा संपूर्ण दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळार्यंत काही खायचं नाही याचा यात समावेश होतो.
डॉ. नितीन कपूर हे तमिळनाडूतील वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये एंडोक्राइनोलॉजीचे (मधुमेह, लठ्ठपणा आणि थायरॉईड यांसारख्या हार्मोनल विकारांचा अभ्यास) प्राध्यापक आहेत.
ते म्हणतात की, काही वैद्यकीय संशोधनात असं आढळून आलं आहे की, अधूनमधून उपवास केल्यानं मेटाबॉलिझमवर चांगला परिणाम होतो.
परंतु, ते असंही सांगतात की, इंटरमिटंट फास्टिंग प्रत्येकासाठी योग्य नाही. यात प्रत्येक व्यक्तीनुसार आहार निश्चित केला पाहिजे.
"तुम्ही आयुष्यभर हे करू शकता का? तुम्हाला 15 किलो वजन कमी करायचं असेल, पण जेव्हा तुम्ही तो डाएट बंद करता तेव्हा तुमचं वजन पुन्हा वाढू शकतं," असंही ते डाएट किंवा उपवासाबद्दल बोलताना म्हणाले.
अशा उपवासावर अजून संशोधन सुरु आहे. काही अभ्यासानुसार असं समोर येत आहे की, ही पद्धत इन्सुलिन संवेदनशीलता चांगली होण्यासाठी मदत करु शकते, असं प्रोफेसर फ्रँकलिन जोसेफ यांनी सांगितलं.
त्यांनी याबाबत एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की, "2015 मध्ये सेल मेटाबॉलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं आढळून आलं की, जे लोक लठ्ठपणाने ग्रस्त नाहीत. त्यांच्यात प्रत्येक दुसऱ्या दिवशी केलेल्या उपवासामुळे शरीराच्या वजनात काही बदल न होता इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते."
इंटरमिटंट फास्टिंगमुळे वजन कमी होऊ शकतं, तसेच इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत आणि चयापचयामध्येही सुधारणा होऊ शकते.
'इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षणं'सुरुवातीच्या काळात इन्सुलिनच्या प्रतिकाराची लक्षणं कमी दिसतात. तरीही, काही लक्षणं आहेत, ज्याच्या माध्यमातून ती ओळखली जाऊ शकतात.
प्रोफेसर जोसेफ यांच्या मते, या लक्षणांमध्ये जास्त भूक लागणे, थकवा येणं, वजन कमी करण्यात अडचणी येणं, त्वचेवर काळे डाग (विशेषतः मान, बगल किंवा कंबरेच्या आजूबाजूचा भाग), उच्च रक्तदाब, उच्च ट्रायग्लिसराइड पातळी (कोलेस्टेरॉलचे वाईट स्वरूप), एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी होणे (कोलेस्ट्रॉलचे चांगले स्वरूप) आणि पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (पीसीओएस) यांचा समावेश आहे.
ते म्हणतात की, जर इन्सुलिन रेझिस्टन्समुळे टाइप 2 चा मधुमेह झाला आणि रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढत असेल तर त्या व्यक्तीमध्ये इतर लक्षणंही दिसू शकतात. यामध्ये वारंवार लघवी लागणं, सतत तहान लागणं आणि डोळ्याला अस्पष्ट दिसणं आदींचा यात समावेश आहे.
प्रोफेसर जोसेफ म्हणाले की, ही सर्व लक्षणं आणि संकेत प्रत्येक व्यक्तींसाठी वेगवेगळी असू शकतात. त्याचबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्सचा सामना करत असलेल्या सर्वांनाच हा अनुभव येईल, असंही नाही.
त्याचबरोबर, ही लक्षणं इतर आरोग्य समस्यांचे संकेतही असू शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.
ते म्हणतात,"इन्सुलिन प्रतिरोध लवकर ओळखणं आणि त्यास अधिक चांगल्या पद्धतीनं सामोरं जाणं गरजेचं आहे. यामुळं टाइप 2 मधुमेह आणि हृदयाशी निगडीत आजारांसारखी गुंतागुंत टाळता येऊ शकते."
यामुळं कोणत्या समस्या उद्भवू शकतात?अभ्यासात असं दिसून आलं आहे की, इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या सुमारे 70 ते 80 टक्के लोकांनी उपचार आणि त्याचं व्यवस्थापन केलं नाही तर त्यांना टाइप 2 मधुमेह होऊ शकतो, असं प्रोफेसर जोसेफ म्हणाले.
ते म्हणाले, "हे अनुवांशिक, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, आहार, वय आणि प्रजातीसारख्या इतर अनेक घटकांवर अवलंबून असतं."
त्यांनी पुढं म्हटलं की, "काही वांशिक गट विशेषतः दक्षिण-पूर्व आशियातील लोकांना कॉकेशियन लोकांपेक्षा टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो."
ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय?ग्लायसेमिक इंडेक्स ही एक प्रणाली आहे. यात अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण किती वेगाने किंवा हळू वाढते या आधारावर ती विभागली जाते.
कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखर किती वेगाने, मध्यम किंवा हळू वाढते, हे आपण ग्लायसेमिक इंडेक्सवरुन जाणून घेऊ शकतो.
कार्बोहायड्रेट्स, जे हळूहळू तुटतात, त्यांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स मानलं जातं. यामध्ये काही भाज्या, फळे, गोड नसलेलं दूध, शेंगा आणि कडधान्य यांचा समावेश आहे.
साखर, खाण्या-पिण्याचे गोड पदार्थ, पांढरे बटाटे, पांढरा तांदूळ हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचे मानले जातात. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढतं.
परंतु, कोणताही खाद्यपदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे की नाही हे केवळ ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे ठरवता येत नाही. उदाहरणार्थ, बऱ्याच चॉकलेट्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. पण त्यात कॅलरी मात्र जास्त असतात.
त्याचप्रमाणं उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ खराबच असतील असं नाही. टरबूजसारख्या अनेक फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतात. पण ही फळं फायदेशीर असतात.
त्यामुळं आपलं लक्ष सकस आणि संतुलित आहारावर असायला हवं.
इन्सुलिनचा रेझिस्टन्स पूर्ववत करता येतो का?प्रोफेसर जोसेफ सांगतात की, "जीवनशैलीतील बदल आणि काही प्रकरणांमध्ये औषधांच्या माध्यमातून इन्सुलिन प्रतिरोध उलटवू शकतो किंवा त्यात सुधारणा करता येऊ शकते."
न्यूट्रिशनिस्ट रीम अल-अब्दलत म्हणतात, "यात आहाराकडे बारीक लक्ष द्यायला हवं. गोड खाणं टाळलं पाहिजे. पिष्टमय पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे."
नियमित व्यायाम केल्यानं वजन कमी होतं. विशेष म्हणजे पोटाच्या आसपासची चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळं इन्सुलिनच्या संवदेनशीलतेत सुधारणा होऊ शकते, असा सल्ला जोसेफ आणि अल अब्दलत या दोघांनी दिला आहे.
यामध्ये अति तणावाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. प्रोफेसर जोसेफ म्हणतात की, ध्यान, योग, दीर्घ श्वास घेण्यासारखे व्यायाम किंवा निसर्गात वेळ घालवण्यासारख्या पद्धतींनी तणावाचा सामना करणं फायदेशीर ठरु शकतं.
चांगली झोप येणं खूप गरजेचं आहे.
शेवटी, मेटफॉर्मिनसारखी औषधं इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि टाइप 2 मधुमेह सारख्या संबंधित परिस्थिती कमी करण्यास मदत करतात.
परंतु, कोणतंही औषध इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी किती मदत करेल हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)