- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
दहावी आणि बारावीनंतर योग्य करिअर मार्ग निवडणे महत्त्वाचे असते, परंतु अनेक विद्यार्थ्यांना यात गोंधळ वाटतो. कल चाचणी (ॲप्टिट्यूड टेस्ट) विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नैसर्गिक कौशल्यांची ओळख करून देते. त्यामुळे करिअर निवडीला योग्य दिशा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी तयार होता येते.
दहावी आणि बारावीनंतर योग्य करिअर निवडणे अनेकदा समाजाच्या प्रभावामुळे, पिअर प्रेशर, जाहिराती, करिअर ट्रेंड, ‘स्कोप’च्या चर्चा आणि पालकांच्या अपेक्षांमुळे गोंधळात टाकणारे ठरते. कल चाचणी विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमता, समस्या सोडविण्याची आणि विचारशक्ती तपासून त्यांना योग्य क्षेत्र निवडण्यास मदत करते. गणित, भाषा, तार्किक विचार आणि सर्जनशीलता यासारख्या कौशल्यांचे मूल्यमापन करून ही चाचणी त्यांची वास्तविक क्षमता दर्शवते.
कल चाचणीविषयीचे गैरसमज
अनेकांना वाटते, ‘आमचे करिअर आधीच ठरले आहे, मग चाचणीची गरज काय?’ तसेच, ‘आम्हाला ज्या करिअरमध्ये जावेसे वाटते, ते कल चाचणीत नाही आले तर?’ असे कलचाचणी विषयी गैरसमज विद्यार्थी व पालकांमध्ये दिसतात. मात्र, कलचाचणी ‘अपेक्षा’ आणि ‘वास्तव’ यामधून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते.
आपण कोणता तरी प्रवाह (स्ट्रीम) निवडला असेल किंवा त्या क्षेत्रात सुरुवात केली असेल, तरीही कल चाचणी गरजेची आहे का? हा देखील गैरसमज आहे. कोणताही प्रवाह निवडला असला तरी, कल चाचणी योग्य दिशा व पुढील वाटचाल समजण्यासाठी उपयुक्त ठरते.
योग्यता आणि आवड यामधील फरक
अनेक विद्यार्थ्यांना योग्यता आणि आवड यामध्ये गोंधळ वाटतो. ‘आवड’ म्हणजे एखाद्या गोष्टीत स्वारस्य असणे, तर ‘योग्यता’ म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी आवश्यक ‘क्षमता’ असणे. उदा. एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याची आवड असू शकते, परंतु त्याची योग्यता डिझाइन आणि सर्जनशीलतेसाठी अधिक असू शकते. योग्य करिअर निवडण्यासाठी योग्यता आणि आवड दोन्हीचा समतोल महत्त्वाचा असतो.
स्पर्धा परीक्षांमध्ये कल चाचणीचे महत्त्व
कल चाचणी केवळ करिअर निवडीसाठीच नव्हे, तर जेईई, नीट, सीईटी, नाटा, एनआयडी, सीयुइटी, आयपी मॅट इ. यांसारख्या स्पर्धा परीक्षांची निवड करताना उपयुक्त ठरू शकते. अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये तार्किक विचारशक्ती, संख्यात्मक क्षमता आणि भाषा कौशल्यांवर आधारित प्रश्न असतात, ज्याचे कल चाचणीद्वारे मूल्यमापन केले जाऊ शकते. कल चाचणी लवकर दिल्यास विद्यार्थी त्यांचे बलस्थान आणि कमकुवत बाजू ओळखू शकतात, समस्या सोडविण्याचे कौशल्य सुधारू शकतात.
कल चाचणी कशी द्यावी?
कल चाचणी शाळा, ऑनलाइन पोर्टल्स आणि करिअर मार्गदर्शन केंद्रांमधून उपलब्ध असते. शाळांमध्ये ती करिअर मार्गदर्शनाचा एक भाग म्हणून घेतली जाते, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारे कल चाचणी होते. चाचणीचे विश्लेषण व योग्य मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कल चाचणीचा निकाल समजून घेता येतो, विषय निवडण्यास मदत होते, योग्य करिअर पर्याय सुचवले जातात आणि करिअरबाबतच्या शंका दूर होतात.
कल चाचणी स्पष्टता, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देते, ज्यामुळे विद्यार्थी योग्य करिअर निवडून भविष्यातील पश्चात्ताप टाळू शकतात.
पुढील लेखात, कल चाचणीनंतर योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन कसे उपयुक्त ठरते, हे आपण पाहणार आहोत.