राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेचं पहिलं जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदासाठी सुरु असलेली लढाई कायम आहे. मागच्या 16 पर्वात राजस्थान रॉयल्सच्या काही काय जेतेपद लागलं नाही. आता 18 व्या पर्वात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सची संघ बांधणी करण्यात आली आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला रिलीज करून काय चूक तर केली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आपलं मत मांडलं आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी जोस बटलरला रिलीज करण्याचा निर्णय खूपच कठीण होता, असं संजू सॅमसन म्हणाला. मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने सहा खेळाडू रिटेने केले होते. त्यामुळे पर्समध्ये कमी पैसे त्यात आरटीएम कार्डही वापरता आलं नाही. लिलावात गुजरात जायंट्सने त्याच्यावर बोली लावत संघात घेतलं. बटलर 2018 पासून 2024 पर्यंत राजस्थान रॉयल्ससोबत होता. त्याने 83 सामन्यात 41.84 च्या सरासरीने 147.79 च्या स्ट्राईक रेटने 3055 धावा केल्या आहेत. संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
संजू सॅमसनने जियोस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘आयपीएल फक्त टीमचं नेतृत्वच नाही तर चांगलं खेळण्याची संधीही देते. तसेच घट्ट मैत्री करण्याची संधीही मिळते.’ असं सांगत पुढे संजू सॅमसनने मन मोकळं केलं. ‘जोस माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. आम्ही सात वर्षे एकत्र खेळलो आणि फलंदाजीत आम्ही चांगली भागीदारी देखील केली. तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. जेव्हा कधी मला अडचण येत होती तेव्हा मी त्याचा सल्ला घ्यायचो. जेव्हा मी कर्णधार झालो तेव्हा तो उपकर्णधार होता. त्याने मला उत्तम कर्णधार होण्यास चांगली मदत केली.’ असं संजू सॅमसन म्हणाला.
‘इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु असताना मी जोससोबत बोललो. तसेच रिलीज करण्याच्या निर्णयातून सावरलो नसल्याचं सांगितलं. जर मला आयपीएलमध्ये एक गोष्ट बदलण्याची संधी मिळाली तर मी दर तीन वर्षांनी खेळाडूंना सोडण्याचा नियम बदलेन. त्याचे फायदे असले तर वैयक्तिक पातळीवर वर्षानुवर्षे तयार झालेलं नातं गमावता. जोस आमच्या कुटुंबाचा भाग होता आणि मी आणखी काय सांगू?’, असंही संजू सॅमसन भावनिक होत पुढे म्हणाला.