आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सांगता झाली. भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार रोहितने अंतिम सामन्यात 252 धावांचा पाठलाग करताना 76 रन्स केल्या. तर विराट कोहली अपयशी ठरला. विराट अवघी 1 धाव करुन बाद झाला. विराटला याचाच मोठा फटका बसला आहे. विराटला अंतिम फेरीत धावा न करणं चांगलंच महागात पडलं आहे. विराटसोबत नक्की काय झालंय?
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीनतंर वनडे रँकिंग जाहीर केली आहे. विराटची या एकदिवसीय क्रमवारीत घसरण झाली आहे. विराटला एका स्थानाने घसरण झाली आहे. विराटची चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी घसरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, विराटच्या खात्यात 736 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराटने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली. मात्र अंतिम सामन्यात त्याला काही खास करता आलं नाही. त्यामुळे दर आठवड्याने येणाऱ्या रँकिंगमध्ये विराटला नुकसान सहन करावं लागलं आहे.
विराटची घसरण झाली असली तरीही टीम इंडियाचा रँकिंगमधील दबदबा कायम आहे. रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे एकूण 4 खेळाडू आहेत. शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे चौघे पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आहेत. शुबमन पहिल्या, रोहित तिसऱ्या, विराट पाचव्या आणि श्रेयस अय्यर आठव्या स्थानी आहे.
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी त्यांचं स्थान कायम राखलंय. विराटची 1 स्थानाने घसरण झालीय. तररोहितने 2 स्थानांची झेप घेतली आहे. शुबमनच्या खात्यात 784 रेटिंग पॉइंट्स आहेत. रोहितच्या नावावर 756 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराट कोहलीकडे 736 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर श्रेयसकडे 704 रेटिंग आहेत.
तसेच फिरकी गोलंदाजांनाही रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.कुलदीप यादव याने सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने आठव्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या स्थानी उडी घेतलीय. श्रीलंकेचा महीश तीक्षणा पहिल्या स्थानी कायम आहे. रवींद्र जडेजा याने 3 स्थानांची उडी घेत टॉप 10 मध्ये धडक दिलीय. तर वरुण चक्रवर्ती याने 16 स्थानांची मोठी झेप घेतलीय.