भोसरी, ता. १२ ः गेल्या दोन महिन्यांपासून खंडोबामाळमधील लक्ष्मी शिंदे चाळीजवळील जलनिस्सारण वाहिनी तुंबून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. सुमारे दीड हजार रहिवाशांना त्याचा त्रास अधिक होत आहे. त्यांना घरी बसणेही अवघड झाले आहे. ही वाहिनी बदलल्याशिवाय समस्या सुटणार नसल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी आर्थिक तरतूदच नसल्याने जलनिस्सारण वाहिनीचे काम होणार अथवा नाही ? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने झाले आहे.
भोसरीतील खंडोबामाळकडे जाणारा रस्ता वर्दळीचा असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. लक्ष्मी शिंदे चाळ परिसरात सुमारे दीड हजार रहिवासी वास्तव्यास आहेत. त्या सर्वांना गटाराच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास होत आहे. लक्ष्मण शिंदे, शरद शिंदे, रवी म्हस्के, वसीम अन्सारी, प्रवीण गोटे, सागर नाईक आदींसह येथील रहिवाशांनी त्याबाबत संताप व्यक्त केला आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
जलनिस्सारण वाहिनी अरुंद...
खंडोबामाळमधील गटाराची जलनिस्सारण वाहिनी अरुंद आहे. त्यामुळे ती तुंबण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत तेथे मोठ्या व्यासाची वाहिनी टाकणे आवश्यक बनले आहे.
दोन महिन्यांपूर्वी सारथीवर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गटार साफ केले. मात्र दररोज हे गटार तुंबण्याचा प्रकार घडत आहे. कर्मचाऱ्यांद्वारे फक्त स्वच्छता केली जात आहे. मात्र ते तुंबूच नये यासाठी महापालिकेच्या जलनिःसारण विभागाद्वारे काही ठोस पावले उचलली जात नाहीत.
- जालिंदर शिंदे, माजी नगरसेवक
समस्या कधी सुटणार ?
खंडोबामाळमधील जलनिस्सारण वाहिनी आणि पावसाळी वाहिन्या स्वतंत्र होत नाहीत. तोपर्यंत गटारे तुंबण्याची समस्या कायम राहणार असल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात आला. त्यातच या कामासाठी महापालिकेने आर्थिक तरतूदच केली नसल्यामुळे ही समस्या कधी सुटणार ? हा प्रश्न अंधातरीच राहिला आहे.
खंडोबामाळमधील पावसाळी आणि जलनिस्सारण वाहिन्या एकत्र जोडल्या गेल्या आहेत. याच वाहिनीला परिसरातील उघडी गटारेही जोडली गेली आहेत. त्यामुळे सांडपाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात कचराही या वाहिनीमध्ये जात असल्याने त्या वारंवार तुंबण्याचा प्रकार घडत आहे.
- हनुमंत पवार, कनिष्ठ अभियंता (जलनिस्सारण), ई क्षेत्रिय कार्यालय, महापालिका