भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, खोक्या अद्याप तरी पोलिसांच्या तावडीत काही सापडला नाही. त्याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतात. खोक्या कधी पैसे उडवतो. तर, कधी कारमध्ये पैशांची बंडल ठेवतो तर, कधी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री. खोक्या जरी फरार असला तरी, त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
फरार सतीश भोसले उर्फ खोक्या याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे केली आहे. सतीश भोसले याच्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत. त्यामुळे चौकशी करूनजप्त करण्यात यावी अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे.
सतीश भोसलेची प्रॉपर्टी कोट्यवधींच्या घरात आहे. तसेच त्याच्याकडे अलिशान गाड्या आहेत. याबरोबरच तो पत्ते खेळण्याचा शौकीन आहे. यातून त्यानं लाखो रूपयांची कमाई केली आहे. अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा, अशी माहिती समोर आली आहे.
यासह राज्यात होत असलेल्या चोऱ्या, चोरी झालेले सोने यातून त्याने लाखांच्या घरात पैसे गोळा केले आहेत. यात आमदार सुरेश धस यांचा देखील आहे. धसांची देखील चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे. राम खाडे यांनी केलेल्या आरोपांवर आणि मागणीवर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत काय पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.