पुणे - शहरातील विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बुधवार (ता. १२) पासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येत आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
विमानतळ परिसरात वाहतुकीत बदल-
विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. १. न्यू एअरपोर्ट रस्त्यावर पुणे विमानतळाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना सिम्बायोसिस विधी महाविद्यालय चौकामध्ये उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग - वाहन चालकांनी दोराबजी मॉल चौकातून यू टर्न घेऊन किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.
बाणेर परिसरात वाहतुकीत बदल -
बाणेर परिसरातील महाबळेश्वर हॉटेल चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पाषाण रस्ता येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.
१. बाणेर पाषाण लिंक रस्त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी डावीकडे वळून ४५ आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू टर्न घेऊन हॉटेल महाबळेश्वर चौकातून विद्यापीठमार्गे इच्छित स्थळी जावे.
२. बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्ता येथे जाण्यासाठी माऊली पेट्रोल पंपाकडून यू टर्न घेऊन पुन्हा महाबळेश्वर हॉटेल चौकात यावे. तेथून डावीकडे वळून बाणेर पाषाण लिंकमार्गे इच्छित स्थळी जावे.
खराडी भागात वाहतुकीत बदल -
१. खराडी बायपासमार्गे खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळून खराडी गाव किंवा युआन आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून सरळ पुढे अडीचशे मीटर अंतरावर जाऊन ‘आपले घर’ बसस्थानकाच्या पुढील बाजूस यू टर्न घ्यावा. तेथून खराडी दर्गा चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.