मुस्लिम बांधवांचे मस्जिदमध्ये आजण सुरु झाले. आजण सुरु झाल्याचा आवाज कानावर येताच येथील आयोजकांनी छावा चित्रपटाचे प्रक्षेपण काही काळापुरते थांबविले.
पंढरपूर : उपरी (ता. पंढरपूर) येथील मस्जिदमध्ये (Muslim Community) अजाण सुरु होताच, छावा चित्रपटाचे (Chhava Movie) प्रक्षेपण थांबवण्यात आले. समाजाला नवी दिशा देणाऱ्या या सकारात्मक घटनेचे व येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या हिंदू- मुस्लिम एकोप्याचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक केले जात आहे.
सध्या देशभरात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. छावा चित्रपटाची ग्रामीण भागात ही तेवढीच लोकप्रियता वाढली आहे. गावातील सर्व सामान्य महिला, नागरिक आणि शाळेतील मुलांना छावा चित्रपट पहाता, यावा यासाठी येथील फिनिक्स ग्रुपच्या वतीने रविवारी (ता. 9) सायंकाळी मारुती मंदिराच्या मैदानावर मोठ्या पडद्यावर छावा चित्रपट दाखवण्याचे आयोजन केले होते.
चित्रपट सुरु झाला. त्याच वेळी मुस्लिम बांधवांचे मस्जिदमध्ये आजण सुरु झाले. आजण सुरु झाल्याचा आवाज कानावर येताच येथील आयोजकांनी छावा चित्रपटाचे प्रक्षेपण काही काळापुरते थांबविले. मुस्लिम बांधवांचे आजण पूर्ण झाल्यानंतर छावा चित्रपटाचे पुन्हा प्रक्षेपण सुरु करण्यात आले. छावा चित्रपट आणि मुस्लिम बंधावांचे आजण ही एका गावातील छोटी गोष्ट असली, तरी ती सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी लाख मोलाची ठरली आहे.
येथील ग्रामस्थ हे नेहमीच विविध महापुरुषांच्या जयंती, विविध धार्मिक कार्यक्रम आणि गावच्या जत्रा यात्रेतून नेहमीच समतेचा आणि एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हिंदू आणि मुस्लिम एक्याचे अतूट असे नाते आहे. येथील मुस्लिम समाजाच्या पीर साहेबांची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन साजरी करतात. यात्रेत सर्व हिंदू आणि मुस्लिम एका कुटुंबाप्रमाणे सहभागी होतात.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा आजही येथे सुरु आहे. रमजान महिन्यातील आजण सुरु असताना छावा चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवून येथील तरुणांनी दिलेला सामाजिक संदेश इतरांसाठी आदर्श आहे. शिवाय, जाती-जातींमध्ये आणि धर्मामध्ये द्वेष पसरवून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या समाज कंठकांसाठी ही मोठी चपराक आहे. दरम्यान, या घटनेतून येथील तरुणांनी दाखवलेल्या हिंदू मुस्लिम एकोप्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रविवारी येथील हनुमान मंदिरात छावा चित्रपट सुरु होता. याच दरम्यान जवळच्या असलेल्या मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांचे अजाण सुरु झाले. लागलीच आम्ही चित्रपटाचे प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतला. आजण झाल्यानंतर पुन्हा चित्रपट सुरु करण्यात आला. एक कुटुंब म्हणून गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.
-सुधाकर गुरव, सामाजिक कार्यकर्ते, उपरी