कसबा पोटनिवडणुकीत 2023 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर जिंकून रवींद्र धंगेकरांनी भाजपसह महायुतीला मोठा धक्का दिला होता.
पण लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या.
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या धंगेकरांना शिवसेना पक्षात आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंत यांना जबाबदारी दिली होती.
महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपही रवींद धंगेकरांच्या पक्षप्रवेशासाठी कित्येक दिवस गळ टाकून होत होते. पण अखेर धंगेकरांना पक्षात आणण्यात शिवसेनेचे उदय सामंत यशस्वी ठरले.
उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकरांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची पुण्यात चांगलीच ताकद वाढली आहे.
यावेळी धंगेकरांनी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं क्रेडिट उदय सामंत यांना दिलं. ते म्हणाले,सामंतसाहेबांनी मला पुन्हा इथं आणलं. ते मस्त जुळवाजुळव करतात. मला तर वाटतं घराघरात भांडणं झाली की, तुम्हालाच न्ह्यायला हवं.
पुण्यात काँग्रेसचा नगरसेवक, आमदार होतो. लोकसभाही लढवली. पण शिंदेसाहेबांच्या कामानं प्रभावित झालो. यापुढे जिथे अन्याय दिसेल तिथे धंगेकर आहेच असा इशाराही विरोधकांना दिला.
काही दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी भगवं उपरणं धारण केलेला स्टेटस ठेवल्यानं त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचे संकेत मिळाले होते.
रवींद्र धंगेकरांनी 2017 साली धंगेकरांनी मनसेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते मूळचे शिवसैनिक राहिले आहेत.