राज्याचा अर्थसंकल्प सोमवारी (ता.10) ला अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यामध्ये अनेक विकासकामांना गती देणाऱ्या प्रकल्पांची घोषणा यावेळी त्यांनी केली. यातच मराठ्यांच्या पराक्रमी युद्धाचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली.
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका असा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज हेआग्र्यात नजरकैदेत होते, याच ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.
पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत दोन टप्प्याच्या कामाला गती देण्यासाठी आणखी 50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
औरंगजेबच्या महाकाय सेनेशी महाराजांनी शूर मावळ्यांना सोबत घेऊन पराक्रमाची लढाई केली. याच राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच भव्य स्मारक उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे. या स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडून 220 कोटी रुपयांचा निधी देण्याचे अजित पवारांनी सभागृहात सांगितले.
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव येथे असलेल्या नायगांव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात होईल.