RTE Admission : आरटीई २५ टक्के राखीव जागांवर ६४ हजारांहून अधिक बालकांचे प्रवेश निश्चित
esakal March 11, 2025 05:45 AM

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या निवड यादीत सुमारे एक लाख एक हजार ९६७ बालकांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला होता. त्यातील केवळ ६४ हजार ३७९ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता पुढील आठवड्यापासून प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’नुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एक लाख नऊ हजार ८७ जागांवरील प्रवेशासाठी सुमारे तीन लाख पाच हजार १५२ अर्ज आले होते.

त्यातील एक लाख एक हजार ९६७ बालकांना निवड यादीत प्रवेश जाहीर झाला. निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली होती. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली होती, या मुदतीपर्यंत ६४ हजार ३७९ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, ‘या प्रक्रियेतील निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. निवड यादीत झालेल्या प्रवेशाची माहिती पोर्टलवर अद्ययावत होत आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करण्यात येईल.’

जिल्हानिहाय प्रवेश निश्चित झालेल्या बालकांची संख्या -

जिल्हा : रिक्त जागा : निवड यादीतील संख्या : निश्चित झालेले प्रवेश

पुणे : १८,४९८ : १८,१६१ : ११,०९४

ठाणे : ११,३२२ : १०,४२९ : ६,५४६

छत्रपती संभाजीनगर :४,४०८ : ४,३४९ : २,३०६

नागपूर : ७,००५ : ६,९६३ : ३,३६५

नाशिक : ५,२९६ : ५,००३ : ३,२३६

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.