भारतीय क्रिकेट संघाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २०२३ वनडे वर्ल्ड कप गमावल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये दमदार पुनरागमन करताना आठ महिन्याच्या अंतरात दोन आयसीसी विजेतीपदं जिंकली आहेत.
दरम्यान, २०२४ टी२० वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही हे तिघे वनडेतून निवृत्त होणार की काय, अशी धाकधुक चाहत्यांच्या मनात होती.
मात्र रविवारी विजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणीही निवृत्त होत नसल्याचे सांगत सर्वांना दिलासा दिला.
या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता वनडे क्रिकेट प्रकारातील सर्वात मोठी स्पर्धा होणार असून ही स्पर्धा २०२७ साली होणार आहे. त्यामुळे अद्याप त्यासाठी दोन वर्षे बाकी आहेत. सध्या रोहित ३७ वर्षांचा आहे, तर विराट आणि जडेजा ३६ वर्षांचे आहेत.
अशात त्यांनी निवृत्ती घेतली नसल्याने ते आता २०२७ वनडे वर्ल्ड कप खेळण्याची दाट शक्यता आहे. २०२७ वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये खेळवला जाणार आहे.
भारत किती सामने खेळणारसाल २०२७ वनडे वर्ल्ड कप सुरू होण्याआधी दोन वर्षात भारतीय संघ संभवत: २७ वनडे सामने खेळणार आहे. भारताला दोन वर्षात विविध देशांविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. भारताला आता आगामी तीन सामन्यांची वनडे मालिका ऑगस्ट - सप्टेंबर २०२५ मध्ये बांगलादेश दौऱ्यात खेळायची आहे.
त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामने भारतीय संघ खेळेल. वर्षाच्या शेवटी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळेल. त्यानंतर २०२६ मध्ये भारतीय संघ सुरुवातीलाच न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खेळेल, तर जून २०२६ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच वनडे मालिका कखेळणार आहे.
जुलै २०२६ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार असून त्यातही ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध भारताला वनडे मालिका खेळायच्या आहेत. २०२७ च्या सुरुवातीलाच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळेल. या सर्व मालिकांमध्ये मिळून भारतीय संघ २७ सामने खेळणार आहे.
२०२७ वनडे वर्ल्ड कपपर्यंत भारताचे वनडे सामने (संभावित)३ वनडे - वि. बांगलादेश, ऑगस्ट २०२५ (परदेशात)
३ वनडे - वि. ऑस्ट्रेलिया, ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०२५ (परदेशात)
३ वनडे - वि. दक्षिण आफ्रिका, नोव्हेंबर - डिसेंबर, २०२५ (मायदेशात)
३ वनडे - वि. न्यूझीलंड, जानेवारी २०२६ (मायदेशात)
३ वनडे - वि. अफगाणिस्तान, जून २०२६ (मायदेशात)
३ वनडे - वि. इंग्लंड,जुलै २०२६ (परदेशात)
३ वनडे - वि. वेस्ट इंडिज, सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२६ (मायदेशात)
३ वनडे - वि. न्यूझीलंड, ऑक्टोबर - डिसेंबर, २०२६ (परदेशात)
३ वनडे - वि. श्रीलंका, जानेवारी २०२७ (मायदेशात)