चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर श्रेयस अय्यरने बोलून दाखवली खंत, म्हणाला…
GH News March 12, 2025 01:07 AM

टीम इंडियाला मधल्या फळीतील फलंदाजांमुळे विजयाची चव चाखता आली. कारण आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीवरच दबाव वाढत होता. या फळीत श्रेयस अय्यरने टीम इंडियाची बाजू सावरली. तसेच निर्णायक धावसंख्या तसेच विजयाच्या वेशीवर आणून सोडण्याचं काम केलं. असं असताना मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरने मनातलं दु:ख बोलून दाखवलं. जेतेपद मिळवून दिल्यानंतर हवी तशी ओळख मिळाली नाही. अपेक्षाभंग झाल्याचं श्रेयस अय्यरने सांगितलं. आयपीएलच्या 18व्या पर्वात श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. पंजाब किंग्सने 26.75 कोटी खर्च करून श्रेयस अय्यरला संघात घेतलं आहे. श्रेयस अय्यरने द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ‘मला वैयक्तिकरित्या वाटतं की आयपीएल जिंकल्यानंतर मला ती ओळख मिळाली नाही. ज्याची मला खऱ्या अर्थाने अपेक्षा होती. सरतेशेवटी जोपर्यंत तुम्हाला स्वाभिमान आहे आणि तुम्ही योग्य ते करत राहता, तोपर्यंत तेच सर्वात महत्त्वाचे आहे. मी हे करत राहिलो.’

आयपीएल स्पर्धेत विजय मिळवणारा श्रेयस अय्यर हा आठवा कर्णधार आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्सला गौतम गंभीरनंतर जेतेपद मिळवून देणारा दुसरा कर्णधार आहे. मागच्या पर्वात कोलकात्याने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. पण कोलकात्याने त्याला रिटेन केलं नाही. त्याच्या पंजाब किंग्सने मोठी बोली लावली. आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने त्याच्यासाठी 26.75 कोटी रुपये मोजले. आयपीएल इतिहासात श्रेयस अय्यर तिसऱ्या फ्रेंचायझीचं नेतृत्व करणार आहे. यापू्र्वी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि आता पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे.

श्रेयस अय्यरने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 243 धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनंतर सर्वाधिक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. बीसीसीआयने सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलाच घाम गाळला. रणजी आणि इराणी करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता. इतकंच काय तर त्याच्या नेतृत्वात मुंबईने डिसेंबर 2024 मध्ये दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.