टीम इंडियाने रविवारी 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास घडवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्मा याने विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितने 76 धावांची महत्त्वाची खेळी केली. तसेच इतर सहकाऱ्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. टीम इंडियाने अशाप्रकारे न्यूझीलंडवर मात करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाचा माजी सलामवीर वीरेंद्र सेहवाग यानेही रोहितचं भरभरून कौतुक केलं.
रोहित सर्वांना सोबत घेऊन असतो, ही त्याची एक खास प्रतिभा आहे. आपल्या गोलंदाजांचा वापर कसा करायचा हे रोहितला ठाऊक होतं. रोहितकडे गोलंदाजीसाठी जितके पर्याय होते, त्या जोरावर भारत एकही सामना न गमावता विजयी झाला, असं रोहितने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
“आम्ही त्याच्या कॅप्टन्सीला कमी लेखतो. मात्र या 2 आयसीसी ट्रॉफीनंतर तो (रोहित), धोनीनंतर सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा कर्णधार ठरला आहे. रोहितकडून गोलंदाजांचा वापर, संघाला सावरणं, मार्गदर्शन करणं आणि संवाद साधणं हे फार स्पष्टपणे करण्यात आलं आहे. रोहितने अर्शदीप सिंह याच्या जागी हर्षित राणा याला खेळवलं. तसेच हर्षितच्या जागी वरुण चक्रवर्ती याला आणलं. रोहितने आपल्या सहकाऱ्यांसह सवांद साधला आणि हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळेच रोहित एक चांगला कर्णधार आहे”, असं सेहवागने स्पष्ट केलं.
“रोहित स्वत:बाबत कमी आणि टीमबाबत तसेच सहकाऱ्यांबाबत फार विचार करतो. रोहित सहकाऱ्यांना त्यांच्याप्रमाणे वागवतो. जर एखाद्या खेळाडूच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल, तर तो चांगला खेळू शकणार नाही, याची जाणीव रोहितला आहे. त्यामुळे रोहित सहकाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण तयार करतो. रोहित सर्वांना सोबत घेऊन असतो. एक चांगल्या कर्णधारासाठी आणि नेतृत्वासाठी हे फार महत्त्वाचं आहे. रोहित हे फार सार्थपणे करत आहे”, असंही सेहवागने म्हटलं.
दरम्यान आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.