Nana Patole : मंत्र्यांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
esakal March 12, 2025 08:45 AM

‘कोणते मटण कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही.

दुकानदारांना प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे भरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याला तंबी द्यावी,’ अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केली.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कायदे करणे हे सरकारचे काम आहे पण एखादा मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हलाल मटण विकत घ्यायचे की आणखी कोणते व ते कोणाकडून घ्यायचे हे मंत्र्यांनी सांगू नये, हे काम त्यांचे नाही.

महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे उपस्थित करून सामाजिक शांतता भंग करण्याचा उद्योग काही लोक करत आहेत, त्याची दखल सरकार व मुख्यमंत्री यांनी घ्यावी. मंत्रिपदाची जी शपथ घेतली त्याचे पालन करावे. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडू नका, असेही पटोले यांनी बजावले.

भोंग्यांसंदर्भात अंमलबजावणी करा

‘भोंग्याच्या आवाजासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो कोणत्या एका धर्मासाठी नसून भोंग्याच्या आवाजासंदर्भात आहे, त्याचे पालन केले पाहिजे. एकाच धर्मासाठी ते लागू केले जात असेल व त्यातून नवे वाद उभे राहतील.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन जे अधिकारी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. भोंग्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही, त्यामुळे गैरसमज पसरवू नका,’ असे आवाहनही पटोले यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.