Video: बिहारमध्ये जंगलराज! दिवसाढवळ्या गुंडांनी शाळेत फेकले बॉम्ब, केली दगडफेक; व्हिडिओ व्हायरल
esakal March 12, 2025 08:45 AM

Bihar Goons Hurl Bombs in School : महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढल्यानं आपण राज्याची तुलना सहजपणे बिहारशी करतो. पण खरंच बिहार असा आहे का? तर हो असं दुर्देवानं म्हणावं लागेल. कारण तशी एक लाजीरवाणी घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये काही गुंडांनी दिवसाढवळ्या एका खासगी शाळेत बॉम्ब फेकले, दगडफेक केली तसंत तोडफोडही केली. यामुळं या शाळा प्रशासनासह विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

नेमकी घटना काय?

वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर शहरातील हा व्हिडिओ असून यामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक एका खासगी शाळेबाहेर जमले आहेत. या लोकांच्या हातात बॉम्ब, दगड आणि दांडकी दिसत आहेत. यातील एका व्यक्तीनं बाहेरुन शाळेच्या गेटच्या आतमध्ये बॉम्ब फेकले. तसंच एकानं बाहेर रस्त्यावर बॉम्ब फेकल्यानं त्याचा स्फोट होऊन सर्वत्र धूर पसरला होता. तसंच काहीजण शाळेच्या आवारात दगड फेकत आहेत तर काही काठ्यांनी तोडफोडही करताना दिसत आहेत. या घटनेनंतर शाळा प्रशासनानं पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱॅत कैद झाली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट केला आहे. तसंच त्यांनी सध्याच्या बिहार सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, हाजीपूरमध्ये गुंडांकडून खासगी शाळेवर बॉम्ब फेकल्याप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी गुंडांना धन्यवाद देत जनतेला विचारलं की, हे यापूर्वी व्हायचं का?

परिसरात दहशत

या घटनेनंतर शाळा प्रशासानासह विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्याचबरोबर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ही घटना दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात आहे. असामाजिक तत्वांनी डीपीएस शाळेच्या गेटवर दगडफेक, बॉम्ब फेकले. पण यामध्ये कुठलंही नुकसान झालेलं नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.