संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच मराठी भाषेचा अपमान होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील चारकोपमध्ये मराठी भाषेचा अपमान झाल्याची घटना घडली. एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला उद्धट उत्तर देताना मराठी भाषेचा अपमान केला. 'मराठीत बोलणार नाही, हिंदीत बोला. मराठी बोलणं गरजेचं नाही, असं उद्धट उत्तर कर्मचाऱ्याने एका ग्राहकाला दिलं. या कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांत परप्रातीयांकडून मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परप्रातीयांकडून मराठी माणसांना झालेल्या घटनेचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटले. त्यानंतर पुन्हा मुंबईच्या चारकोपमधील एअरटेल गॅलरीत मराठी भाषेचा अपमान झाल्याची घटना घडली आहे.
चारकोपमधील एअरटेल गॅलरीतील हा प्रकार घडला आहे. एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्याने ग्राहकाला उद्धट उत्तर दिलं. महिला कर्मचारी म्हणाली,'आम्हाला मराठी येत नाही. आम्ही मराठीत बोलणार नाही. तुम्हीच हिंदीत बोला. मराठी बोलणं गरजेचं नाही'. मराठी ग्राहकाला दिलेल्या उद्धट उत्तरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेलमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
एअरटेलमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे अखिल चित्र म्हणाले, एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत, ते कायम ठेवायचे असतील. तर योग्य पावले उचला नाही, तर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही, पण मराठी भाषिक ८०% कर्मचारी असायलाच हवे'.