आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. जेतेपदासाठी 10 संघांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचा दबदबा पाहायला मिळाला. या संघांनी पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. असं असताना यंदाच्या पर्वात नवा विजेता पाहायला मिळेल की नाही याची चर्चा रंगली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रेट लीने स्पर्धेच्या जेतेपदाबाबत भाकीत वर्तवलं आहे. ब्रेट लीच्या मते यंदाच्या पर्वातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद मिळणं कठीण आहे. ब्रेट लीने जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला पसंती दिली आहे. ब्रेट लीने सांगितलं की, मुंबईला जेतेपद मिळवायचं असेल तर सुरुवातीचे सामने जिंकणं गरजेचं आहे. मागच्या काही पर्वात मुंबईची स्पर्धेतील सुरुवात हवी तशी होत नाही. त्यामुळे नंतर स्पर्धेत स्थान टीकवणं कठीण होतं.
ब्रेट लीने सांगितलं की, ‘मागच्या चार पाच वर्षात मुंबई इंडियन्ससोबत असं होत आलं आहे. सुरुवातीच्या चार पाच सामन्यात हरतात. पण आता मुंबईला हे चित्र बदलावं लागेल. जर मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या पाच सहा सामन्यात जिंकते तर प्लेऑफमधील स्थान पक्क होईल. जर मुंबई इंडियन्स असं करण्यात यशस्वी ठरली तर नक्कीच सहावा किताब जिंकेल.’ मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली होती. तसेच गुणतालिकेत शेवटच्या स्थानी होती.
ब्रेट लीने चेन्नई सुपर किंग्सबाबतही आपलं मत मांडलं. ‘चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा संघ बांधणी करत आहे. या संघात काही चांगले खेळाडू आहे. तर आता नव्या खेळाडूंचा भरणा झाला आहे. या संघात सातत्यपूर्ण कामगिरी असणं गरजेचं आहे. पण मुंबई इंडियन्सचं पारडं चुन्नई सुपर किंग्सच्या तुलनेत भारदस्त आहे.’, असं ब्रेट लीने सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर आहे. पण सर्वांच्या नजरा या धोनीच्या खेळीकडे लागून आहेत.