आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर सुरु झालेलं निवृत्तीचं सत्र अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ, बांगलादेशचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम या दोघांनी निवृ्त्ती घेतली. त्यानंतर आता आणखी एका दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मुशफिकुर रहीम याच्यानंतर बांगलादेशचा बॅटिंग ऑलराउंडर महमूदुल्लाह याने निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. महमदुल्लाह याआधीच टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
महमूदुल्लाह याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा शेवटचा ठरला. महमूदुल्लाने हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळला. बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळी फेरीत 3 पैकी फक्त 2 सामनेच खेळता आले. तर पाकिस्तानविरुद्धचा सामना टॉसविनाच रद्द झाला. बांगलादेशला दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तसेच महमूदुल्लाहला त्या 2 पैकी फक्त न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातच खेळण्याची संधी मिळाली. महमूदुल्लाहने न्यूझीलंडविरुद्ध 24 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध 4 धावा केल्या.
तसेच महमूदुल्लाहलाने याआधीच टी 20 फॉर्मेटमधून निवृ्ती घेतली होती. बांगलादेश 2024मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा उभयसंघात 2 कसोटी आणि 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात आली होती. तेव्हा महमूदुल्लाह याने या मालिकेनंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
मुशफिकुर रहीमनंतर महमूदुल्लाह याने निवृत्ती घेतल्याने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या दोघांनी बांगलादेश क्रिकेटची दशकभरापेक्षा जास्त सेवा केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
महमूदुल्लाह याने बांगलादेशचं 239 एकदिवसीय, 141 टी 20i आणि 50 कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचं प्रतिनिधित्व केलं. तसेच त्याने या दरम्यान नेतृत्वही केलं. महमूदुल्लाहने वनडेत 7 हजार 330, कसोटीत 2 हजार 914 आणि टी 20i क्रिकेटमध्ये 2 हजार 443 धावा केल्या. तसेच त्याने वनडेत 82, कसोटीत 43 आणि टी 20i मध्ये 41 विकेट्सही घेतल्या.