गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) परदेशी आजी-माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. नुकतीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने स्पर्धा हायब्रिड मॉडेलने खेळवण्यात आली.
महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचे या स्पर्धेतील पाचही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम या एकाच ठिकाणी पार पडले.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतही पोचल्याने ते सामने देखील दुबईत पार पडले. त्यामुळे बऱ्याच जणांनी त्यावर टीका केली होती. त्यातच भारताने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले आहे.
आता माजी वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू अँडी रॉबर्ट्स यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केलाय की आयसीसी नेहमीच बीसीसीआयच्या बाजूने निर्णय घेते.
भारतीय क्रिकेट संघाकडे व्ह्युवरशिप आणि महसुल मिळवून देण्याची क्षमता असल्याने बीसीसीआयला खूप विशेषाधिकार मिळाले आहेत, जे इतर क्रिकेट बार्डांना मिळत नाही, असंही अनेक जणांनी मत मांडले आहे.
अँडी रॉबर्ड्स यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले 'माझ्यासाठी आयसीसी म्हणजे इंडिय क्रिकेट बोर्ड आहे. भारताकडून सर्व हुकूम दिले जातात. जर उद्या, भारताकडून सांगण्यात आले की नो-बॉल आणि वाइड नसावेत,' तर माझे शब्द लक्षात ठेवा, तर अशावेळी देखील आयसीसी भारताचे समाधान करण्याचा मार्ग शोधेल.'
अँडी रॉबर्ट्स यांनी पुढे आयसीसीला अशीही विनंती केली की कधी कधी बीसीसीआयची विनंतीही अमान्य करायला हवी.
ते म्हणाले, 'कधीकधी अमान्यही करा. भारत सर्वकाही नाहीये. आयसीसीने गरज असेल, तेव्हा भारताला नाही देखील म्हणायला हवे. गेल्या वर्षीच्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही भारताला एक फायदा होता, जिथे त्यांना त्यांचा उपांत्य सामना कुठे खेळला जाईल हे आधीच माहित होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील भारताने अजिबात प्रवास केल नाही. एखादा संघ स्पर्धेदरम्यान प्रवास करत नाही, हे कसं काय?'
दरम्यान, या वादावर अद्याप बीसीसीआयकडून मात्र कोणतचं भाष्य करण्यात आलेलं नाही.