Solapur: सोलापूरमध्ये खासगी इंग्रजी शाळांचे शुल्क १० पटीने वाढले, शिक्षणाधिकाऱ्यांचा पालकांना कानमंत्र
esakal March 13, 2025 12:45 AM

Private English Schools In Solapur: मागील १० ते १२ वर्षांपासून खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला असून हीच बाब ओळखून शाळांकडून दोन वर्षातून एकदा शुल्कात वाढ केली जात आहे.

दहा वर्षांत खासगी विनाअनुदानित शाळांचे शैक्षणिक शुल्क १० पटीने वाढले असून सध्या सोलापूर शहरातील खासगी शाळांमध्ये विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्यास प्रवेश घेण्यासाठी वर्षाला २५ हजार ते सव्वालाख रुपये मोजावे लागत आहेत. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांना एक कानमंत्र दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात २००८-०९ या वर्षात ५० पेक्षाही कमी इंग्रजी शाळा होत्या, पण १६ वर्षांत येथे खासगी इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित पावणेतीनशे शाळा वाढल्या आणि अजूनही दरवर्षी जिल्ह्यात सहा ते आठ शाळा वाढत आहेत. दुसरीकडे मात्र, जिल्हा परिषद शाळांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.

जिल्हा परिषदेच्या ९० शाळा विद्यार्थीअभावी बंद आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण २७७७ शाळा आहेत. त्यातही सुमारे ३०० शाळांचा पट २० पेक्षाही कमी आहे. अनिर्बंधपणे खासगी रिक्षांमुळे (खासगी प्रवासी वाहने) बहुतेक शहरांमधील सार्वजनिक परिवहन उपक्रमांची वाट लागली, त्याच पद्धतीने आता गावागावात सुरू होणाऱ्या स्वयंअर्थसहाय्यिता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्हा परिषदांच्या शाळांनाही घरघर लागली आहे.

पालकांची महत्वकांक्षा ओळखून इंग्रजी शाळा आता पायाभूत सुविधा पुरेशा असो किंवा नसो, शुल्क दर दोन वर्षाला वाढवितातच. १० वर्षांमध्ये शैक्षणिक शुल्क १० पटीने म्हणजेच किमान २० ते ८० हजारापर्यंत वाढले आहे. दुसरीकडे, अशा शाळांचे सुरवातीचे निर्धारित शुल्क किती असावे, यावर ना सरकारचे ना शासनाचे निर्बंध. त्यामुळे राज्यात शुल्क नियंत्रण समिती असूनही त्याला लगाम बसला हे शाळांच्या शुल्कवाढीवरून दिसून येते.

जिल्ह्यातील खासगी शाळा अन् वार्षिक शुल्क

एकूण इंग्रजी शाळा : ३२९

प्रवेशित अंदाजे विद्यार्थी : १.२३ लाख

ग्रामीणमधील शाळांचे शुल्क : ७,००० ते ३०,०००

शहरी शाळांमधील शुल्क : २५,००० ते १,२०,०००

दर दोन वर्षाला विनाअनुदानित (स्वयंअर्थसहाय्यिता) इंग्रजी शाळा त्यांच्या शैक्षणिक शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकतात. शाळेतील भौतिक सुविधा व अन्य बाबींमुळे बहुतेक शाळा त्यांचा खर्च भागावा म्हणून शुल्क वाढवतात आणि त्याप्रमाणात विद्यार्थ्यांना सुविधाही देतात. शुल्कवाढीवर कोणाला आक्षेप असल्यास तो पालक शाळेच्या शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत नोंदवू शकतो. दुसरीकडे शुल्काच्या कारणातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान कोणालाही करता येत नाही.

- हरिश शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिज असोसिएशन

शैक्षणिक वर्षाची सुरवात होण्यापूर्वी शाळांनी आयोजित केलेल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत पालकांना शाळेच्या शुल्कासंदर्भात हरकत असल्यास ती नोंदवता येते. त्यानंतर तक्रार देऊनही ठोस काही करता येत नाही. पण, शुल्क न दिल्याच्या कारणातून कोणतीही शाळा विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न देणे, शाळेत न घेणे असे करू शकत नाही. असे प्रकार आढळल्यास त्या शाळांवर कडक कारवाई होऊ शकते.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.