परंपरा, संस्कृती जपणारा लोकोत्सव
esakal March 13, 2025 12:45 AM

परंपरा, संस्कृती जपणारा लोकोत्सव
गावागावांत खालुबाजाचा गजर; पालख्या नाचवण्याचा जल्लोष

महाड, ता. १२ (बातमीदार) : परंपरागत लोकोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होळीचा म्हणजेच शिमग्याचा सण संस्कृती आणि लोकगीतांनी नटलेला आहे. खालुबाजाचा गजर, पालख्या नाचवण्याचा जल्लोष, फेरे धरून होळीभोवती गायली जाणारी लोकगीते अशी ग्रामीण परंपरा आणि लोकसंस्कृती जपत आजही गावागावांत होलिकोत्सव साजरा होत आहे.
वाडीवस्तीवर विखुरलेल्या बारा बलुतेदारांना व अठरापगड जातींना एकत्र आणणाऱ्या या उत्सवाला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. गुरुवारी रात्री मोठी होळी म्हणजेच होम लावला जाणार आहे. या होमामध्ये मोठे लाकूड, गवत, गोवऱ्या, तांदूळ, तूप व इतर अनेक वनौषधी होळीमध्ये जाळण्यासाठी अर्पण केल्या जातात. होळीमध्ये मधोमध ठेवल्या जाणाऱ्या मोठ्या लाकडाची म्हणजेच होळकुंडाची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. अग्निकुंडातून शुद्धीकरण आणि वाईट वृत्तीला आहुती अशी धारणा होळीदहनामध्ये आहे.
शहरामध्ये चौकात, रस्त्याच्या कडेला तर ग्रामीण भागामध्ये मंदिराजवळ अथवा शेतात अशा प्रकारचे होम रचले जातात. होळीची पुजाऱ्याकडून विधिवत पूजा केली जाते आणि सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे होमाला अग्नी देतात. हा होम पेटविण्यापूर्वी गायली जाणारी गाणी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतात. या लोकगीतातून आपल्या व्यवसायाशी निगडित असणारे बारा बलुतेदार व त्यांचे वर्णन दिसून येते.
‘कलकीच्या बेटी एक कोम जन्मला,
लावला... वाकला... गगनाशी गेला,
वाकडा... तिकडात... गगनाशी गेला’
हे गीत होळीला फेर धरून म्हटले जाते. गाणे गात होळीमध्ये तांदूळ अर्पण केले जातात. पालखी बनविणारा सुतार, सोन्याने पालखी सजविणारा सोनार, साळव्याने कापड बनवणारे, तांबटाकडून तांब्या-पितळेची साधने दिली जातात. अशाप्रकारे लोहार, सुतार, सोनार, कुंभार, कासार, शिंपी, तांबट अशा विविध बलुतेदारांना या लोकगीतामध्ये मानाचे स्थान दिले जाते. कोकणामधील सर्व गावांमध्ये हे लोकगीत आजही गायले जाते. त्यासोबत स्थानिक ग्रामदेवतांची नावेही जोडली जातात. अशा या लोकगीतातून सामाजिक व जातीय एकोपा साधण्याचे काम लोकोत्सवातून होत आहे.
पारंपरिक गाणी आणि नृत्यातून सादर होणारे खेळे, पौराणिक कथांवर आधारित नमन, गवळण, ग्रामदेवतेची पालखी नाचवणे आणि सर्वात लहान व मोठ्यांना आवडणारा संकासूर अशा लोककला या सणात दिसून येतात. पालखी नाचवण्याचा सोहळा अविस्मरणीय असतो. राक्षसाचा मुखवटा घातलेला, हातात लाकडी काठी नाहीतर कोयता घेऊन संकासूर लहान मुलांना घाबरवतो, त्यांना पकडण्यासाठी धावतो, अशा विविध लोककलेतून हा सण अधिक मनोरंजनात्मक होतो.

चाकरमान्यांची उपस्थिती
जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी चाकरमानी गणेशोत्सव आणि शिमगोत्सवात हमखास कोकणात येतात. सध्या वाड्या-वस्तीवरील बंद घराचे दरवाजे उघडले आहेत. साफसफाई सुरू झाली आहे. चाकरमान्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणात असते की एसटी वाहतूक आणि कोकण रेल्वेला जादा गाड्यांची सोय करावी लागली आहे. याच काळात ग्रामदेवतेच्या पालख्या प्रत्येक घरामध्ये नेल्या जातात. देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी चाकरमानी सर्व हेवेदावे विसरून एकत्र येतात. लोककला, लोकसंस्कृती, पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या लोकगीतांतून लोकोत्सव साजरा केला जातो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.