अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
होळी सण भारतभर साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये होळीला प्रचंड महत्त्व आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. यासाठी बरेचसे लोक झाडे तोडतात. अवैध्यरित्या झाडे तोडण्यावर वचक बसवण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता होळीसाठी झाडे तोडल्यास १ लाख रुपयांचा दंड बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झाडे तोडणाऱ्यांवर पुणे महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जर कोणी झाड तोडताना सापडला, तर त्याचा दंड म्हणून १ लाख रुपयांचा दंड बसणार आहे. यासंबंधित पत्रक महानगरपालिकेने प्रसिद्ध केले आहे. यानुसार झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
होळीनिमित्त अनेक ठिकाणी लाकूडतोड केली जाते. साठी अनेकजण झाडे तोडतात. यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका शहरातील वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ व आसपासच्या परिसरातील झाडे तोडीवर करडी नजर ठेवणार आहे.
महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम २०२१ या कायद्यानुसार, विनापरवाना झाडे तोडणे, झाडे जाळणे हा दंडात्मक गुन्हा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून झाडे तोडणाऱ्या व्यक्तींकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करणार आहे.