Jalgaon Accident : रेल्वे फाटक तोडत ट्रकची रेल्वेला धडक, अमरावती एक्सप्रेसने नेले फरपटत
esakal March 15, 2025 07:45 AM

जळगाव : गव्हाने भरलेला ट्रक मुक्ताईनगरकडून बोदवडकडे येत असताना बंद असलेले रेल्वे फाट तोडत थेट अमरावती एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वेची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती.

या अपघातामुळे तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. तमिळनाडू येथील ट्रक शुक्रवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास बोदवडकडे गहू घेऊन जात होता. रेल्वे पुलावरून न जाता ट्रक बंद असलेले रेल्वे फाटक तोडून थेट रुळांवर आला.

त्याचवेळी अमरावती एक्सप्रेस अमरावतीकडे जात होती. वेगात असलेल्या या रेल्वेगाडीला ट्रक धडकला. गाडीने ट्रकला २०० ते ३०० मीटरपर्यंत फरपटत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत करण्यासाठी पोहचले.

ट्रक इंजिनखाली

अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिनखाली निम्मा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन, जेसीबी घटनास्थळी बोलविण्यात आले. परिसरातील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन लावून ती रात्री उशीरा मार्गस्थ करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.