न्यूयॉर्क : इटलीच्या संशोधकांनी प्रथमच प्रकाशाला गोठविण्याची किमया साधली असून त्याला ‘सुपरसॉलिड’ स्वरूप प्राप्त करून दिले आहे. ‘सुपरसॉलिड’ ही पदार्थाची दुर्मिळ अवस्था म्हणून ओळखली जाते. या अवस्थेमध्ये घनरूप आणि प्रतिरोध शून्य प्रवाह पाहायला मिळतो. ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये हे ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पुंज भौतिकीमधील हे एक महत्त्वाचे संशोधन मानले जाते. या मुळे क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ऑप्टिकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते.
‘सुपरसॉलिड’ ही पदार्थाची अनोखी अवस्था असून तीत घनरूप कठोरपणा आणि ‘सुपरफ्लूएड’सारखा प्रवाह पाहायला मिळतो. आतापर्यंत सुपरसॉलिडिटी ही स्थिती बोस- आइन्स्टाईन कंडेन्सेट्समध्ये (बीईसी) पाहायला मिळत असे. यातही शून्याच्या पातळीपर्यंत जेव्हा बोसोन कणांचा समूह गोठविला जातो तेव्हा ही अवस्था तयार होत असे. ‘सीएनआर नॅनोटेक’मधील अँटोनिओ गियानफेट आणि पेव्हिया युनिव्हर्सिटीतील डेव्हिड निग्रो यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले होते.
त्यात त्यांनी प्रकाश देखील ही विलक्षण अवस्था प्राप्त करू शकतो असे स्पष्ट केले. शास्त्रज्ञांनी गॅलियम आर्सेनाइड स्ट्रक्चरचा वापर करून लेसर किरणांचा मारा केला आणि त्यातून हायब्रीड लाइट मॅटर पार्टीकलची निर्मिती करण्यात आली. त्यालाच पोलॅरिटॉन्स असे नाव देण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये फोटॉन्सची संख्या वाढल्यानंतर सॅटेलाइट कंडेन्सेट्सची निर्मिती झाली. हा पॅटर्न सुपरसॉलिडिटीचा दर्शक मानला जातो. हे ताजे संशोधन म्हणजे प्रकाशाच्या सुपरसॉलिडीटीच्या आकलनाचा प्रारंभ असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
या ताज्या संशोधनाचा मोठा फायदा क्वांटम कॉम्प्युटिंगला होणार असून संशोधकांना याचा वापर करून आणखी स्थिर क्वांटम बिट्स (क्युबिट्स) तयार करता येतील. ऑप्टिकल डिव्हायसेस, फोटोनिक सर्किट्स आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये या संशोधनाचा मोठा लाभ होणार आहे. भविष्यात या क्षेत्रामध्ये नेमके कशा प्रकारचे संशोधन होते त्यावर बऱ्याचशा बाबी अवलंबून असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे.
सेमीकंडक्टरचा वापरशास्त्रज्ञांनी प्रकाश गोठविण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्याऐवजी पुंज भौतिकी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. त्याद्वारे ही सुपरसॉलिड अवस्था प्राप्त करण्यात आली होती. यामध्ये सेमीकंडक्टर प्लॅटफॉर्मचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला होता. साधारणपणे फोटॉनवर प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. याच प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनचे वर्तन देखील तपासण्यात आले होते.