डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतील घुसखोर आणि अवैध वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांनाही ट्रम्प प्रशासनाने मायदेशी पाठवलं होतं. अपमानास्पदरित्या वागणूक दिल्याच्या मुद्द्यावरूनही चर्चा झाली होती. दरम्यान, आता एका भारतीय विद्यार्थीनीने अमेरिकेनं व्हिसा रद्द केल्यानंतर स्वत:च अमेरिका सोडली. रंजनी श्रीनिवास असं तिचं नाव असून तिने सीबीपी होम अॅपचा वापर करून सेल्फ डिपोर्ट केलं. तिनं हमासचं समर्थन केलं होतं.
अमेरिकेच्या गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थीनीने सेल्फ डिपोर्टचा वापर केला. तिचा व्हिसा हमासचं समर्थन केल्यामुळं रद्द केला होता. कोलंबिया युनिव्हर्सिटीत ती अर्बन प्लॅनिंग विभागात ती शिकत होती. एफ१ व्हिसावर रंजनी श्रीनिवासने प्रवेश केला होता.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रंजनीचा व्हिसा ५ मार्च २०२५ रोजी रद्द केला. यानंतर ११ दिवसांनी तिने सीबीपी होम अॅपचा वापर करून स्वत:ला डिपोर्ट केलं. याचा व्हिडीओसुद्धा रंजनीने बनवलाय.
अमेरिकेचे गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, युएसएमध्ये राहणं आणि अभ्यास करणं यासाठी व्हिसा मिळवणं हा विशेषाधिकार आहे. जेव्हा तुम्ही हिंसा आणि दहशतवाद्याचा पुरस्कार करता तेव्हा हा विशेषाधिकार रद्द केला पाहिजे आणि तुम्ही या देशात राहिलं नाही पाहिजे. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील दहशतवादी समर्थकांपैकी एक असलेल्या विद्यार्थीनीने सेल्फ डिपोर्ट केल्याचं पाहून आनंद झाला.
वेस्ट बँकची आणखी एक पॅलेस्टाइनची विद्यार्थीनी लेका कोर्डियाला आयसीई एचएसआय नेवार्कच्या अधिकाऱ्यांनी अटक केलीय. एफ१ व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही अधिक काळ वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे. अटेंडेंन्सच्या कमतरतेमुळे तिचा व्हिसा २६ जानेवारी २०२२ रोजी संपला होता.