Dola Purnima : ओडिशात भक्ती-रंगाची उधळण; डोला पौर्णिमेच्या उत्सवात हजारो भाविक सहभागी
esakal March 15, 2025 03:45 PM

भुवनेश्वर : सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला डोला पौर्णिमेचा पारंपरिक उत्सव ओडिशामध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आला. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा रंगबेरंगी सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. दशमी पासून ते पौर्णिमेपर्यंत सहा दिवस हा आनंदोत्सव सुरू असतो.

अत्यंत सुंदर सजविलेल्या पालखीतून भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या मिरवणूक काढत जत्रेची सुरुवात होते. भजन, भक्तिगीते, प्रार्थना यामुळे वातावरण भक्तिमय होऊन जाते. प्रत्येक घरातून भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवला जाते. भाविक बासरी वाजवत उत्सवात सहभागी होतात.

पौर्णिमेच्या दिवशी देवतांसाठी भव्य झुला महोत्सव आयोजित केला जातो. डोला पौर्णिमेचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘डोला मेलाना’! विविध गावांतील देवतांच्या मूर्तींची यावेळी भव्य मिरवणूक निघते. सर्व मूर्ती मेलाना पाडिया या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र आणल्या जातात. इथे सर्व झुले एका व्यासपीठावर ठेवले जातात. पारंपरिक संगीत, ढोल, बासरी आणि भक्तिगीतांच्या गजरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जगन्नाथ मंदिरातील उत्सव

डोला पौर्णिमेला पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातही विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान जगन्नाथाची ‘डोला गोविंदा’ म्हणून पूजा केली जाते. देवतांना ‘सुनाबेशा’ (सुवर्ण अलंकार) परिधान करून झुल्यावर विराजमान केले जाते. मंदिरातील उत्सवामध्ये परंपरागत ‘डोला यात्रा’ आयोजित केली जाते. भगवान जगन्नाथाच्या बारा प्रमुख विधींपैकी ही एक आहे. भगवान जगन्नाथासह गोविंदा, भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या मूर्तींना विशेष सजवलेल्या पालख्यांमध्ये बसवून ‘डोला मंडप’ येथे नेले जाते. येथे देवता एकमेकांवर गुलाल उधळून होळी खेळतात, अशी परंपरेने मान्यता आहे.

रंग आणि आनंदाचा उत्सव

हा सण भगवान श्रीकृष्णाच्या खेळकर स्वभावाचे प्रतीक मानला जातो. पुराणकथांनुसार, श्रीकृष्णाने वसंत ऋतूचे स्वागत आपल्या मित्रांसोबत रंग उधळून आणि विनोद करत साजरे केले होते. वृंदावनातील या परंपरेचेच प्रतिबिंब डोला पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवातील ‘अबीर’ खेळण्याच्या रीतीत दिसून येते.

पौराणिक कथांमध्ये उत्सवाचा उल्लेख

डोला पौर्णिमा उत्सवाचा उगम प्राचीन काळातच झाल्याचे मानले जाते. हा सण ओडिशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये गुंफलेला आहे. ‘डोला’ म्हणजे झुला. म्हणूनच हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा झुला महोत्सव म्हणून ओळखला जातो. ओडिशाच्या प्राचीन परंपरेत हा सण ‘बसंतोत्सव’ म्हणूनही ओळखला जातो. हिंदू पौराणिक कथांनुसार, डोला पौर्णिमेचा सण प्राचीन ‘मदनोत्सव’पासून विकसित झाला आहे. पूर्वी मदन (कामदेव) याला समर्पित असलेल्या या उत्सवाचे कालांतराने रूपांतर ‘डोलोत्सवा’त झाले. हा सण भगवान श्रीकृष्णाच्या राधेवरील प्रेमाची आणि त्यांच्या खेळकर स्वभावाची आठवण करून देत असतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.