चित्रादा (आंध्रप्रदेश) : केंद्र सरकार आणि तमिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या भाषिक संघर्षामध्ये आता आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांनी उडी घेतली आहे. निमित्त होते पक्षाच्या अकराव्या स्थापना दिनाचे. हिंदीच्या मुद्द्यावरून तमिळी नेते हे ढोंगीपणा करत आहेत.
जेव्हा आर्थिक लाभाचा विषय येतो तेव्हा हीच मंडळी तमिळी चित्रपटांना हिंदीमध्ये प्रसिद्ध होऊ देतात असा घणाघात त्यांनी केला. बॉलिवूडचा पैसा चालतो मग हिंदी का नको? असा सवाल त्यांनी केला. पवन कल्याण यांच्या टीकेला ‘द्रमुक’ने देखील प्रत्युत्तर दिले असून त्यांना या मुद्द्याचे आकलन नसल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.
पवन कल्याण म्हणाले की आपण २०१४ मध्ये एकट्याने पक्षाची स्थापना केली होती. मला आंध्रप्रदेश आणि तेलंगणमधून शंभर असे नेते उभे करायचे आहेत जे देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतील. आम्ही २०१९ ची निवडणूक लढविली असल्याने पराभवाची भीती उरलेली नाही. पराभव होऊन देखील आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे.
संस्कृतला विरोध कशासाठी?भाषिक वादावर बोलताना ते म्हणाले की देशाची विविधता टिकवून ठेवायची असेल तर एका पेक्षा अधिक भाषांचे अस्तित्व हे महत्त्वपूर्ण आहे. आज जी मंडळी हिंदीला विरोध करत आहेत तीच मंडळी आर्थिक फायद्यासाठी त्यांचे चित्रपट हे हिंदी भाषेत प्रसिद्धी होऊ देतात. यावेळी त्यांनी लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेवर देखील भाष्य केले. काहीजण हे संस्कृत भाषेला कशासाठी विरोध करत आहेत हे मात्र माझ्या आकलनापलीकडचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘द्रमुक’चे प्रत्युत्तरपवन कल्याण यांचे आरोप ‘द्रमुक’चे प्रवक्ते डॉ. सय्यद हफीझुल्लाह यांनी फेटाळून लावले. तमिळनाडूची भाषिक भूमिका व धोरणाची त्यांना फारशी माहिती नाही. आमच्या राज्याने कुणालाही हिंदी अथवा अन्य भाषा शिकण्यासाठी विरोध केला नाही पण हिंदी अथवा अन्य भाषेची सक्ती करता कामा नये अशी आमची भूमिका आहे असे ते म्हणाले.
हिंदी भाषा आमच्यावर लादू नका. हा मुद्दा काही अन्य भाषांच्या द्वेषाचा नसून तो स्वतःची मातृभाषा, सांस्कृतिक ओळख आणि आत्मसन्मानाच्या रक्षणाचा आहे. कुणी तरी हे पवन कल्याण यांना समजून सांगायला हवे.
- प्रकाश राज, अभिनेते