कोल्हापूर : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या सांगलीतील मैत्रीणीशी जवळीक साधून सुमारे साडेचार लाखांच्या ऐवजाची चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. योगेश वसंत पाटील (वय ४५, भवानी मंडप, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, योगेश पाटील याच्याशी सांगलीतील एका उच्चशिक्षित माहिलेची फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर ते वारंवार भेटत होते. अशाच भेटीतून २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ते लक्ष्मीपुरीतील टेम्पो लाईनजवळ थांबले होते.
तेथे फिर्यादी महिलेकडील पन्नास हजार रुपयांचा मोबाईल हॅण्डसेट, साडेतीन लाखांची सात तोळे सोन्याची चेन, पन्नास हजार रुपये त्याने संमतीशिवाय घेतले. त्यानंतर महिलेने याचा तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिला होता. अलीकडेच त्यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांनी योगेश पाटीलला अटक केली. चायनीज गाडी ते बॉडी बिल्डर अशी त्याची ओळख असल्याचे सांगण्यात येते.