मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमानंतर महापालिकेची स्वच्छता
esakal March 17, 2025 12:45 AM

वाशी, ता. १६ (बातमीदार) : नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये जगप्रसिद्ध संगीतकार मार्टिन गॅरिक्स यांच्या कार्यक्रमाचे आयोजन होळी सणानिमित्त करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक नवी मुंबईत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक बदल करीत नियोजन केले होते, शिवाय नवी मुंबई महापालिकेनेही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा संकलन व वाहतुकीचे नियोजन केले होते.
जानेवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय लोकप्रिय संगीतमय कार्यक्रमाच्या वेळी घनकचऱ्याचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे अगदी पहाटेपर्यंत कचरा संकलन व वाहतूक सुरळीत करून शहर स्वच्छतेवर कोणताही परिणाम होऊ न दिल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची प्रशंसा नागरिकांप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता प्रक्रियेला गती दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व पर्यवेक्षक, स्वच्छतादूत तसेच कचरा वाहतूक पर्यवेक्षक, व्यवस्थापक व सर्व स्वच्छता दूत यांनी सफाई कामाला गती देत रात्रीच पहाटेपर्यंत जलद स्वच्छता केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.