भाजपने विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
त्यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावांचा समावेश आहे.
दादाराव केचे हे आर्वी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांना संधी देत भाजपने दिलेला शब्द पाळला आहे.
केचे यांची विधानसभेला उमेदवारी कापून सुमित वानखेडेंना तिकीट देण्यात आलं होतं.
यामुळे केचे नाराज झाले होते. उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरीचे संकेत देत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घेत समजूत काढली. यावेळी त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता.
इतकंच नव्हे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांना भेटायला दिल्लीला बोलवून समजूत काढल्यानंतर केचेंनी माघार घेतली.
केचेंनी वर्धा जिल्ह्याचे विद्यमान खासदार अमर काळेंना आर्वी मतदारसंघातून दोनदा पराभूत केलं आहे. या मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे.