Pune Crime: पुण्यात तलवार गँगची दहशत! धारदार शस्त्राने २ चारचाकी फोडल्या, ७ जणांवर गुन्हा दाखल
Saam TV March 17, 2025 01:45 AM

पुण्यात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील बालेवाडीत काही तरूणांनी आरडाओरडा करत, हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच धारदार शस्त्राने दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. यासह पान टपरीचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील एफ रेसिडेन्सी सोसायटी जवळ रात्री दीडच्या सुमारास काही गुंडांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. एक चारचाकी प्रवासीवाहन-चालक प्रवाशांची वाट बघत असताना त्या ठिकाणी तीन दुचाकीवरून ७ अनोळखी तरूण आले. त्यांच्याकडे धारदार शस्र होते. त्यांनी या शस्त्रांचा वापर करून चारचाकीच्या काचा फोडल्या.

गुंडांच्या हातात तलवारी देखील होत्या. शिवीगाळ करत टवाळखोर वाहन चालकाला दमदाटी करत होते. धारदार शस्त्रांचा वापर करत तरूणांनी पान टपरीचे नुकसान केले. तसेच त्याच भागात उभी असलेल्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले. या प्रकरणी याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनेचा तपास केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर हे गुंड मुंबई-बंगळुरू महामार्गा जवळील सेवा रस्त्यावरून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. याची माहती बाणेर पोलिसांनी मिळाली. यादरम्यान, या टोळीला पोलिसांनी रात्री साडेतीनच्या दरम्यान अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.