दहावी-बारावीची परीक्षा संपली, मुलींना आता बालविवाहाची भीती! सोलापूर जिल्ह्यात ५६१ गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक ठराव, तरी ११ महिन्यांत रोखले ११३ बालविवाह
esakal March 17, 2025 05:45 AM

सोलापूर : इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७ मार्च रोजी संपणार आहे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा विचार करणे अपेक्षित आहे, पण अनेक पालक कौटुंबिक परिस्थितीसह अन्य कारणांमुळे मुलीचा बालवयातच विवाह लावून देतात. परीक्षा संपल्याने आता अनेक मुलींना पालक विवाह लावून देतील, अशी भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बाल संरक्षण विभाग सतर्क झाला आहे.

ग्रामसेवक हा त्या गावचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतो, परंतु त्यांच्या तक्रारीवरून किंवा पुढाकारातून बालविवाह रोखल्याची उदाहरणे अत्यल्पच आहेत. लग्नसराईत बालविवाहाचे प्रमाण अधिक असते आणि त्याअनुषंगाने चाईल्ड लाईनवर सरासरी दररोज तीन-चार तरी कॉल येतातच. त्यावेळी जिल्हा पातळीवर काम करणारी बाल संरक्षण समिती त्याठिकाणी जाऊन पोलिसांच्या मदतीने विवाह रोखण्याचे काम करते.

बालविवाहाची प्रथा बंद होऊन त्यासंबंधीचा कायदा झालेला असतानाही ही प्रथा अजूनही सुरूच आहे. १ एप्रिल २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२५ या काळात जिल्ह्यातील ११३ बालविवाह रोखले आहेत. या कालावधीत सुमारे १५ किशोरी माता, कुमारी माता आढळल्या आहेत. ही कुप्रथा बंद होण्यासाठी पालकांची मानसिकता व समाज जागृती आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

‘चाईल्ड लाईन’वर करा संपर्क

१०९८ (बालविवाह होत असेल तर नागरिकांना या क्रमांकावर संपर्क करता येतो. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवले जाते.)

ग्रामीण पोलिस म्हणतात, ५६१ गावांमध्ये प्रतिबंधात्मक ठराव

तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण भागातील बालविवाहाची प्रथा कायमची बंद व्हावी, यासाठी स्वतंत्र योजना सुरू केली होती. बालविवाह होणारी गावे निश्चित करून त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ती गावे दत्तक दिली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या पॅटर्नचे कौतूकही केले होते. त्यावेळी जिल्ह्यातील ५६१ गावांनी बालविवाह प्रतिबंधात्मक ठराव देखील केले होते. मात्र, आता ही योजना कागदावरच असून बालविवाहाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते.

बालसंरक्षण समित्यांसह सर्वांनी मिळून काम केल्यास प्रथा होईल बंद

पालकांची व समाजाची मानसिकता बदलली तर कोणतीच कुप्रथा सुरू राहणार नाही. पालकांनी मुलींच्या भविष्याचा विचार करून तिला शिक्षण देऊन स्वावलंबी करावे, जेणेकरून तिला सांसारिक अडचणी येणार नाहीत. बाल संरक्षण समित्या गावोगावी असून त्यांनीही पुढील काळात सजग रहायला हवे. जेणेकरून बालविवाहाला लगाम बसेल.

- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.