पुणे : ‘सोने-चांदी आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक निश्चितच चांगला परतावा देते. भावात परिस्थितीनुसार चढ-उतार होतो. या गुंतवणुकीतून कमी कालावधीत परतावा किंवा परताव्याची टक्केवारी नेहमीच सारखी राहण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे,’ असे कमॉडिटी आणि म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. भविष्यात गुंतवणुकीच्या या दोन्ही पर्यायांचा सुवर्णकाळ असेल, असा विश्वासही या तज्ज्ञांनी व्यक्त केला.
शेअर बाजारातील घसरण, म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील परिणाम आणि सोने-चांदीच्या भावातील विक्रमी वाढ या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ यांच्या वतीने रविवारी (ता. १६) गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पीएनजी अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक आणि आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे क्षेत्रीय व्यवस्थापक शैलेंद्र दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दीक्षित म्हणाले, ‘‘अचानक घडलेल्या काही घटनांमुळे मार्केट कधी खाली येते, तर कधी वर जाते. या काळात गुंतवणूकदारांनी टिकून राहणे गरजेचे असते, कारण वेळ ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. कपडे, वाहने, घड्याळ, मोबार्इल या वस्तू जास्त वेगाने महाग होत नाहीत. अन्न, आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी झपाट्याने महाग होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत वाढत्या खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे.’’
गुंतवणूक कशी करायची, मार्केट कसे बदलते, जगभरातील घटनांचा मार्केटवरील परिणाम, ‘एसआयपी’मधील गुंतवणुकीचा देशाला होणारा फायदा अशी विविध माहिती त्यांनी सोप्या भाषेत सांगितली.
मोडक म्हणाले, ‘‘सोने शाश्वत असल्याने त्यात गुंतवणूक करताना जास्त विचार केला जात नाही. गेल्या चार वर्षांत विविध देशांतील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. गोल्ड ईटीएफ आल्यानंतर या क्षेत्रात मोठे बदल झाले. सोन्याची खरेदी गुंतवणूक असेल तर त्याची खरेदी-विक्री होणे गरजेचे आहे. कारण सराफी बाजारातही मंदी येऊ शकते. उत्पन्न किंवा नफा मिळविण्यासाठी योग्य वेळी विक्रीही केली पाहिजे. सोन्यातून दरवर्षी सारखाच परतावा मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. चांदीचा औद्योगिक वापर होत असल्याने ती बाजारातून हळूहळू बाहेर जाते. त्यामुळे येत्या काळात तिचा तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो.’’
‘सकाळ मनी’ मासिकाचे संपादक मुकुंद लेले यांनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.
शैलेंद्र दीक्षित यांचे सल्ले- आर्थिक निर्णय घेताना महिलांना सहभागी करा
- परतावा मिळविण्याच्या मागे लागताना जोखीम विसरू नका
- जीवनात शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा
- मार्केट भावनेवर नाही तर परिस्थितीवर चालते हे लक्षात ठेवा
- मार्केट पडले म्हणून ‘एसआयपी’ थांबवू नका
- ‘इक्विटी’मध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा
अमित मोडक यांचे सल्ले- अनिश्चितता निर्माण होर्इल तेव्हा सोन्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा
- डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असेपर्यंत सोने तेजीतच राहणार आहे
- भारतातील सणवारांनुसार सोन्या-चांदीच्या भावात फरक पडत नाही हेही ध्यानात ठेवा
- एंट्री व एक्झिट लोड आणि जीएसटी समजून न घेता डिजिटल सोन्यात गुंतवणूक नको
- उत्पन्न किंवा नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक म्हणून घेतलेले सोने विकणे गरजेचे
- चांदी हे ‘बाय-प्रॉडक्ट’ असल्याने भविष्यात तुटवडा निर्माण झाल्यास चांदी भाव खाऊ शकते.
१) मयूर कॉलनी, कोथरूड ‘सकाळ मनी’ आणि ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ यांच्या वतीने आयोजित गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक.
२) शैलेंद्र दीक्षित - 15245
३) अमित मोडक - 15244