लाहोर : बलुचिस्तान प्रांतातील नोश्की जिल्ह्यात आज राष्ट्रीय महामार्गावर पाकिस्तानी सैनिक व अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर एक मोटार वेगाने धडकवून केलेल्या हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानमधील पोलिसांनी मात्र या हल्ल्यात केवळ पाचच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
मागील आठवड्यात ‘बीएल ए’ने जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत रेल्वेगाडीसह प्रवाशांचे अपहरण केले होते. अपहृतांमध्येही माजी सैनिकांचे प्रमाण अधिक होते. यावेळी सैन्यदलाने केलेल्या कारवाईत ‘बीएलए’च्या ३३ बंडखोरांचा मृत्यू झाला होता. यानंतरही त्यांनी हल्ल्याचे धोरण कायम ठेवताना फ्रंटियर कॉप या निमलष्करी दलाच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसवर मोटार धडकवली. या मोटारीमध्ये आत्मघाती बंडखोर होते.
या धडकेमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे बसमधील सैनिकांपैकी ९० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. स्फोटानंतर ‘बीएलए’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मोटार स्फोटकांनी भरलेली होती, असे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून हल्ल्यास जबाबदार असलेल्यांचा शोध घेतला जात आहे.