रत्नागिरी : ‘‘औरंगजेब हा क्रूर शासक होता. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महायुतीचे सरकार संरक्षण देत आहे. राज्यात ज्या पद्धतीने गुंडगिरी, महिलांवर अत्याचार, हल्ले सुरू आहेत, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभारही औरंगजेबाप्रमाणेच सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये तर काळू-बाळूंचा तमाशा सुरू आहे,’’ असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भाई जगताप, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, हुसेन दलवाई आदी उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, ‘‘नीतिमत्ता, संयम, संस्कार या मूल्यांना पायदळी तुडवणारे महायुतीचे सरकार आहे. त्याची किंमत समाजाला मोजावी लागत आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहेत. केंद्रातील एका खासदाराची मुलगी सुरक्षित राहू शकत नाही, मग हे सरकार महिलांची सुरक्षा काय करणार? छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा, अशी योजना महायुतीने आणली आहे.
महायुतीच्या शासनामध्ये शेतमालाला हमीभाव नाही, लाडकी बहीण योजनेत महिलांची फसवणूक केली. अनेक बहिणी वंचित राहिल्या आहेत. महायुती शासन सर्व स्तरावर अयशस्वी ठरले आहे. औरंगजेब क्रूर शासक होता. त्याने आपल्या भावांचीही हत्या केली. तो कायम धर्माचाच आधार घेत असे. फडणवीसांचा कारभारही तसाच आहे. राज्यात आज खासदारांच्याही लेकी सुरक्षित नाहीत.’’
सत्तेमध्ये अनेक सत्तापिपासू प्रवृत्तीची माणसे आहेत. टोळ्या एकत्र येऊन हे सरकार बनले आहे. गॅंगवॉर सरकार असा खेळ सुरू आहे. बीडमध्ये तर टोळक्यांचा धिंगाणा सुरू आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
सपकाळ म्हणाले...पक्षबांधणी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू
आघाडी-युती अपरिहार्य आहे
संविधानाला अभिप्रेत काम आम्हाला करायचे आहे
भाजपने सद्भावना रसातळाला नेण्याचे काम केले
राज्यात काँग्रेसचे अस्तित्व दुर्बीण लावून शोधावे लागत आहे. त्यामुळे सपकाळ यांनी आधी आपले अस्तित्व निर्माण करावे, मग त्यांच्या विधानाची दखल घेण्याचा विचार करू. अस्तित्वहिन नेत्यांच्या वक्तव्याला आमच्या लेखी शून्य किंमत आहे.
प्रवीण दरेकर, भाजप नेते