मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडून अकरावी-बारावीतील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविली जाते; मात्र मागील तीन वर्षांत या योजनेतील मुलींच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आली आहे.
अकरावी-बारावीतील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रामुख्याने तीन योजना राबविल्या जातात. त्यात एसटी बसमध्ये मोफत बसप्रवासासाठी अहिल्याबाई होळकर योजना, मोफत शिक्षण योजना आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजना आहेत त्यापैकी मोफत शिक्षणाच्या योजनेचा मोफत लाभ घेणाऱ्या मुलींची संख्या २०२२-२३ पासून २०२४-२५ या तीन वर्षांच्या काळात १२.९९ लाख असून, त्यात एकाही मुलींची वाढ झाली नसल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील लाभार्थी मुलींची संख्या मागील तीन वर्षांपासून केवळ ०.४ लाख इतकी असून त्यातील खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात तफावती दिसत आहे.