जगभरात सध्या वाढत असलेल्या असहिष्णुतेचे एक ठळक लक्षण म्हणजे रंगांधळेपण. त्यातूनच ‘एकतर तुम्ही आमच्याबरोबर असाल किंवा आमचे शत्रू असाल’ असा पवित्रा घेतला जात आहे. जिथे जावे तिथे या प्रकारचा दुभंग दिसतो. काही जण भवताली घडणाऱ्या घटनांंकडे केवळ काळ्या वा पांढऱ्या रंगातच पाहू शकतात. खरे तर त्याच्या मधल्या अवकाशात कितीतरी रंग आणि छटा असतात. पण या लोकांना त्याचा थांगपत्ताही नसतो. सर्वच काळात असे लोक असतात; पण आताच्या काळात त्यांची संख्या आणि प्रभाव वाढताना दिसतो आहे. ‘नाइन इलेव्हन’च्या घटनेनंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘आयदर यू आर विथ अस, ऑर विथ टेररिस्ट’ असे जे उद्गार काढले होते, तो याच मानसिकतेचा उघडावागडा आविष्कार होता. उदारमतवादी, खुली व्यवस्था अशी ओळख आजपर्यंत सांगणाऱ्या अमेरिकेत ट्रम्प प्रशासन जी धोरणे आखत आहे, त्यामागे ही मानसिकता अगदी ठळकपणे दिसते.
पश्चिम आशियातील युद्धासंदर्भात सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेपेक्षा थोडी जरी वेगळी भूमिका घेतली तरी त्याला ‘हमास’समर्थक ठरवले जात आहे. गृहमंत्रालयाकडून परदेशी विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. खरे तर इस्राईल व ‘हमास’च्या युद्धाला एक मोठी पार्श्वभूमी आहे. इस्राईल आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी अनेक वर्षे झगडत आहे, तशीच पॅलेस्टिनी जनतेचीही स्वतःच्या राज्याची आकांक्षा आहे. सध्याच्या संघर्षात तोडगा काढू पाहणाऱ्यांनादेखील या दोन्हीचा विचार करावा लागणार आहे. या संघर्षातील गुंतागुंत लक्षात न घेता पॅलेस्टिनींच्या मागणीला सहानुभूती म्हणजे ‘हमास’ची पाठराखण हे समीकरण तयार करण्याचे कारण काय? अशाप्रकारचा बंदिस्त दृष्टिकोन हुकूमशाही, सर्वंकषवादी व्यवस्थांमध्ये आढळत असेल तर नवल नाही. पण लोकशाही मानणाऱ्या देशांतही याप्रकारची मानसिकता प्रबळ होत असेल तर तो काळजीचा विषय ठरतो.
ताज्या काही घटना त्याकडेच निर्देश करणाऱ्या आहेत. कुठल्याच सत्ताधाऱ्यांना टीका सहन होईनाशी झाली आहे. मग ती भाजपची राज्ये असोत वा इतर पक्षांची. ताजे उदाहरण तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे. समाजमाध्यमांवरून त्यांच्याविरोधात लिहिलेल्या कथित बदनामीकारक, असभ्य मजकुराबद्दल दोन महिलांना अटक करण्यात आली. संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी ‘‘समाजमाध्यमांवरून शिविगाळ करणारा मजकूर लिहाल तर निर्वस्त्र करून धिंड काढू,’’ अशी भाषा वापरली, तीदेखील विधानसभेत बोलताना. ‘पत्रकार’ या शब्दाची व्याख्या केली पहिजे. त्यात जे समाविष्ट होतात, ते सोडून इतरांना ‘गुन्हेगार’ मानले पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारच्या एखाद्या धोरणावर टीका केली की त्याला देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न होतो आणि या सरकारच्या एखाद्या निर्णयाबद्दल कुणी चांगले बोलले की तो ‘सत्तेपुढे लाचार’ किंवा ‘भक्त’ अशी संभावना केली जाते. ‘मोदी सर्वत्र पूज्यते’ आणि ‘मोदी सर्वत्र वर्ज्यते’ असे दोन गट पडल्याने २०१४नंतरचे राजकीय चर्चाविश्व त्यानुसार दुभंगलेले आहे. त्यातही हिंदू-मुस्लिम प्रश्नासारखा धार्मिक अस्मितेचा प्रश्न आला की मग तर परिस्थितीतील ताण आणि स्फोटकता कितीतरी पटींनी वाढते. महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणाचीही त्यासंदर्भात दखल घ्यावी लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारणाऱ्या औरंगजेबाचे चुकूनही उदात्तीकरण होता कामा नये आणि खपवूनही घेता कामा नये.
याबद्दलच्या लोकांच्या भावनाही तीव्र आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याला त्यामुळेच सार्वत्रिक पाठिंबा मिळाला. पण आता स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणारे गट औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर उखडून टाकण्याची भाषा करीत असून राज्यातील काही मंत्रीदेखील त्याला खतपाणी घालताना दिसत आहेत. अधिकाधिक भडक, अधिकाधिक सवंग बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या तापलेल्या वातावरणात ती कबर उखडण्यास विरोध करणाऱ्यांची ‘औरंगजेबसमर्थक’ अशी संभावना करणेही सध्याच्या या दुभंगलेल्या वातावरणात अगदी सोपे झाले आहे. त्याचाच फायदा उठवत भाजप-शिवसेनेतील काही जण हिंदुत्वाचे नवनवे ‘ब्रॅंड’ घेऊन ‘हृदयसम्राटपदा’ची झूल अंगावर चढवत आहेत.
खरेच त्यांना प्रामाणिकपणे काही करायचे असेल तर गड-किल्ल्यांच्या संरक्षण-संवर्धनापासून इतिहास लेखन-संशोधनापर्यंत कितीतरी विधायक कामे करण्याजोगी आहेत. पण अशा कामांमध्ये कष्ट असतात. ते करण्याची यांची तयारी नाही. त्यांचे राजकीय हिशेब काय असतील ते असोत; पण भविष्यात भाजपलाच अशी मंडळी डोईजड होऊ शकतात, हे नेतृत्वाला लक्षात घ्यावे लागेल. महायुती सरकारने कायद्याची बूज राखण्याचे कर्तव्य बजावतानाच राज्याचे वातावरण कलुषित होणार नाही,याचीही खबरदारी घ्यायला हवी. दिवसेंदिवस टोकदार होत चाललेले ध्रुवीकरण कमी कसे करता येईल, हे त्यांना पाहावेच लागेल.