एअरपोर्ट रोडवर अंदाधुंद गोळीबार, गोळ्या झाडून हायप्रोफाईल नेत्याची हत्या, शहरात खळबळ
GH News March 17, 2025 12:09 PM

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात अज्ञात हल्लेखोरांनी जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) चे वरिष्ठ नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना क्वेट्टा शहरातील एअरपोर्ट रोडवर घडली. या घटनेमुळे पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या क्वेटा शहरातील एअरपोर्ट रोडवर जेयूआयचे नेते मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या सुरक्षा दलाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी क्वेट्टाहून ताफ्तानला जाणाऱ्या एका लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यात सात जवान शहीद झाले, तर २१ जण जखमी झाले. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी हल्ला केला होता.

जाफर एक्सप्रेस हायजॅक

जाफर एक्सप्रेस ही दुपारी १.३० दरम्यान पोहोचते. मात्र त्यापूर्वीच तिच्यावर हल्ला करण्यात आला. बोलान येथील मशफाक बोगद्यात ही ट्रेन हायजॅक करण्यात आली. या घटनांमुळे पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्था आणि दहशतवादी हल्ले यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.