Pakistan vs Balochistan : पाकिस्तानचे अजून किती तुकडे पडतील? बलुचिस्तानसोबत विश्वासघाताचा इतिहास काय आहे?
GH News March 17, 2025 01:10 PM

द्वेषाच्या पायावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानला विकास आणि प्रगती या दोन शब्दांचा अर्थ कधीच समजला नाही. दुसऱ्याच्या वाईटात स्वत:चा आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे माणसाचा कधी घात होतो, हे त्यालाच कळत नाही. आज पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा हेच होतय. भारताच्या वाईटावर टपलेला हा देश आज फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्या देशात गृहयुद्ध सुरु आहे. 11 मार्च रोजी क्वेटावरुन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसच बलूच बंडखोरांनी केलेलं अपहरण हे त्याचच उदहारण आहे. पाकिस्तानात सध्या अंतर्गत यादवी, असंतोषाची स्थिती आहे. एकाबाजूला अफगाणिस्तान सीमेवर तालिबानसोबत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान या प्रांतांचा स्वातंत्र्यासाठी लढा सुरु आहे. त्यातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत. बॉम्बस्फोट, घात लावून सैन्य वाहनावर हल्ला यामध्ये पाकिस्तानी सैनिक, नागरिकांचा नाहक बळी जात आहे.

भारताला त्रास देण्यासाठी म्हणून पाकिस्तानने दहशतवादाच जाळं उभारलं. हा जो त्यांनी दहशतवादाचा भस्मासूर उभा केला, तो त्यांच्यावरच उलटला हा भाग वेगळा. पण पाकिस्तानला आपल्याच देशातील लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही, मन जिंकता आलं नाही. त्यामुळेच आज तिथे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वा या प्रांतांना पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे. भारताने सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. भारतात सर्व जाती, धर्मांचा सन्मान केला जातो. प्रत्येकाला आपलं धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. विकासाच्या सर्वांना समान संधी आहेत. पण पाकिस्तानात असं नाहीय. पाकिस्तानात पंजाबी मुस्लिमांच्या वर्चस्वामुळे असंतोष धुमसत आहे. राजकारणापासून ते सैन्य, अन्य संवैधानिक संस्था, उद्योग क्षेत्र यावर पंजाबी मुस्लिमांचा वर्चस्व आहे. यातूनच बांग्लादेशची निर्मिती झाली. आता बलूचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा त्याच वाटेवर आहे. जाफर एक्सप्रेस हायजॅकने पाकिस्तानातील अंतर्गत भयाण वास्तव दाखवून दिलय.

बलूचिस्तानच्या संघर्षाची सुरुवात कुठून होते?

बलूचिस्तान पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळातील 44 टक्के भाग बलूचिस्तानात येतो. बलूचिस्तानच आकारमान जर्मन देशाएवढ आहे. पण लोकसंख्या फक्त दीड कोटी. पाकिस्तानच्या 25 कोटी लोकसंख्येपैकी बलूचिस्तानात केवळ सहा टक्के लोक राहतात. बलूच नावाच्या जातीवरुन या राज्याला बलूचिस्तान नाव पडलं. बलूचिस्तानची सीमा इराण, अफगाणिस्तान या देशांना लागून आहे तसच बलूचिस्तान अरबी समुद्राला सुद्धा लागून आहे. बलूचिस्तानात बलूच, पश्तून आणि अन्य जातीच्या लोकांच वास्तव्य आहे. बलूचिस्तानला जबरदस्तीने पाकिस्तानात विलीन करण्यात आलं आहे. बलूच समुदायाची स्वत:ची संस्कृती, भाषा आणि ओळख आहे. हेच पाकिस्तान सरकारसोबतच्या संघर्षाच पहिलं कारण आहे. पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांग्लादेश. त्यावेळी पाकिस्तानने बांग्लाभाषिक आणि त्यांच्या संस्कृतीला महत्त्व दिलं नाही. आज बलूचिस्तानची सुद्धा हीच स्थिती आहे. आपली ओळख मिटवण्याचा प्रयत्न होतोय असं बलूच समुदायाला वाटतं.

पाकिस्तान बलूचिस्तानला कधीच का वेगळं होऊ देणार नाही?

आज बलूचिस्तानचा विकास झालेला नाही. तिथे गरीबी, उपासमारीची स्थिती आहे. पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. पाकिस्तानात पंजाब प्रांत जितका विकसित आहे, तितका या भागाचा विकास झालेला नाही. भले बलूचिस्तानात गरीबी असेल, पण इथे नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. त्या बाबतीत बलूचिस्तान पाकिस्तानातील श्रीमंत राज्य आहे. इथे तांब आणि सोन्याच्या अनेक खाणी आहेत. पण त्यांचा विकास झालेला नाही. रेको डिक नावाच्या खाणीत कॅनडाच्या बॅरिक गोल्ड कंपनीची 50 टक्के हिस्सेदारी आहे. लोखंड, झिंक आणि कोळशाच्या खाणी सुद्धा या भागात आहेत. या नैसर्गिक साधन संपत्तीच्या बळावर पाकिस्तानची तिजोरी भरली जातेय. पण याचा फायदा तिथल्या स्थानिक बलूच जनतेला होत नाही. हे रोषामागच एक प्रमुख कारण आहे. आमच्या प्रांतातील या स्त्रोतांवर आमचा पहिला अधिकार असला पाहिजे, ही तिथल्या स्थानिकांची मागणी आहे. पण पाकिस्तानने नेहमीच आपल्या सैन्य शक्तीच्या बळावर ही मागणी दडपून टाकली आहे.

बलूच नागरिकांच्या मनात भिती कसली?

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक (CPEC) कॉरिडोर हे सुद्धा ताज्या संघर्षाच एक कारण आहे. CPEC चा बराचसा भाग बलूचिस्तानातून जातो. या कॉरिडोरमुळे आपल्या भाषा, संस्कृतीचा ऱ्हास होईल असं बलूच बंडखोरांच म्हणणं आहे. या विकासाचा त्यांना काहीच फायदा होत नाही. उलट इथली विपुल साधन संपत्ती चीनच्या ताब्यात चाललीय असं त्यांचं म्हणण आहे. त्यामुळे बलूचिस्तानात या CPEC प्रोजेक्टवरुन मोठा असंतोष आहे. चीनने या इकोनॉमिक (CPEC) कॉरिडोरसाठी आतापर्यंत अब्जावधी रुपये गुंतवले आहेत. पण बलूच बंडखोरांकडून इथे सुरु असलेल्या विकास प्रकल्पांना सतत लक्ष्य केलं जातय. चिनी इंजिनिअर्स, कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरु आहेत. यात आतापर्यंत अनेक चिनी नागरिकांनी प्राण गमावले आहेत. चीनने वारंवार इथे काम करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पाकिस्तानसमोर मांडला आहे. CPEC प्रोजेक्टमुळे चीनचा प्रभाव वाढेल, पंजाबींच वर्चस्व असलेल्या पाकिस्तानी सैन्य प्रतिष्ठानना फायदा पोहोचेल आणि आपणच आपल्या प्रांतात अल्पसंख्यांक होऊ या भितीतून बलूचिस्तानात स्वातंत्र्य लढ्याला धार आली आहे. पण नैसर्गिक साधन संपत्ती आणि CPEC प्रोजेक्ट यामुळे पाकिस्तान सहजासहजी बलूचिस्तान आपल्या हातून जाऊ देणार नाही.

त्यावेळी बलूचिस्तानातून मोदी यांच्या भूमिकेच स्वागत

बलूचिस्तानात आज जी स्थिती आहे, ती रातोरात निर्माण झालेली नाही. 1947 साली फाळणी झाली, भारत-पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले, तेव्हापासून बलूचिस्तानचा स्वातंत्र्य लढा सुरु आहे. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर जिन्ना सरकारने त्यांना फसवलं असं बलूच नागरिकांच मत आहे. हक्क, अधिकार, समानता यापासून वंचित ठेवणं हे बलूच संघर्षाच मूळ कारण आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बलूचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी बलूचिस्तानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच स्वागत झालं होतं.

वांशिक संघर्षातून नरसंहार

पंजाबी मुस्लिमांच वर्चस्व असलेल्या पाकिस्तानने आपल्याच देशात मानवाधिकाराच उल्लंघन करण्यात कधीच मागेपुढे पाहिलं नाही. 1971 साली पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच बांग्लादेश आणि आता बलुचिस्तान. वांशिक संघर्षातून पाकिस्तानने आपल्याच देशात नरसंहार केलाय. नागरिकांवर अमानवीय अत्याचार केले. पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानात घरात घुसून अत्याचार करतं. अनेक बलूच नागरिकांना गायब करण्यात आलं. अनेक बलूच कैदी पाकिस्तानी तुरुंगात आहेत. आता जाफर एक्सप्रेस हायजॅकच्यावेळी बलूच लिबरेशन आर्मीने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.

1947 ला बलूचिस्तानची रचना कशी होती?

फाळणीनंतर भारत-पाकिस्तान ही दोन राष्ट्र अस्तित्वात आली. त्यावेळी आजचा बलूचिस्तान कालात, खारान, लास बेला आणि मकरान या चार भागांमध्ये होता. या चारही भागांच नियंत्रण तिथल्या सरदारांकडे होतं. कालातचा सरदार ताकतवर मानला जायचा. त्यांच्या नियंत्रणाखाली अन्य सरदार होते. फाळणीआधी कालात, खारान, लास बेला आणि मकरान या चारही भागांना तीन पर्याय देण्यात आले. भारत किंवा पाकिस्तान या दोघांपैकी एकाच निवड करा किंवा स्वतंत्र राहा. यात कालात वगळता तिघांनी पाकिस्तानची निवड केली. पण खान मीर अहमद यार खान म्हणजे खान ऑफ कालातने स्वतंत्र होण्याचा पर्याय निवडला.

इतिहासकार दुश्का एच. सय्यीद यांच्यानुसार कालातला त्यावेळी काश्मीर आणि हैदराबादसारख महत्त्व नव्हतं. कारण कालातची सीमा भारताला लागून नव्हती. ते पाकिस्तानच्या आतमधल्या भागात होतं. त्यामुळे फाळणीनंतर कालातवर ताबा मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला नाही.

जिना यांनी कसं फसवलं?

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी सुद्धा सुरुवातीला कालातच स्वातंत्र्य मान्य केलं होतं. खान मीर अहमद यार खान यांनी मोहम्मद अली जिनांसोबत मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे विश्वास ठेवला. कालातने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य घोषित केलं. पण पुढे काही महिन्यांनी मोहम्मद अली जिना यांनी कालातच्या सरदाराचा विश्वास मोडला. पाकिस्तानने ऑक्टोंबर 1947 साली कालातवर पाकिस्तानात विलीन होण्यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केली. 17 मार्च 1948 साली कालातच्या तीन भागांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. त्यावेळी कालातच्या सरदारांना भारतासोबत जायचं असल्याची अफवा पसरली. म्हणून 26 मार्च 1948 रोजी पाकिस्तानने आपलं सैन्य बलूचिस्तानात पाठवलं. जबरदस्तीने कालातला पाकिस्तान सोबत जाण्याच्या करारावर स्वाक्षरी करावी लागली. तेव्हापासूनच स्वतंत्र बलूचिस्तानचा हा संघर्ष सुरु झाला, जो अजूनही कायम आहे. सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान हे भाग आज फक्त कागदावर पाकिस्तान सोबत आहेत. पण इथली जनता मनातून पाकिस्तानसोबत नाहीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.