वणी- सारसाळे (ता. दिंडोरी) शिवारात असलेल्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बारावर्षीय शालेय मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिसरीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. सारसाळे गावालगत असलेल्या पाझर तलावावर रविवारी (ता. १६) दुपारी एकच्या दरम्यान गायत्री धनराज घुटे (वय १२, रा. सारसाळे) व राधिका एकनाथ वटाणे (१२, रा. मूळ गाव काझीमाळे, हल्ली रा. सारसाळे) या दोन्ही कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असताना त्यातील एकीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. पडलेल्या मैत्रिणीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरी पाण्यात पडली.
ही बाब जवळच असलेल्या चैतन्या प्रवीण गायकवाड हिच्या लक्षात आल्यावर मदतीसाठी आरडा ओरड करीत तीही पाण्यात उतरली अन बुडणाऱ्या दोघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीही पाण्यात बुडू लागल्याने परिसरातील काहींनी धाव घेत चैतन्या हिला बाहेर काढत वाचविले; परंतु गायत्री घुटे व राधिका वटाणे या दिसल्या नाहीत. तेथे जमलेल्यांपैकी पोहता येत असलेल्या काही तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सुमारे १० ते १५ मिनिटांनी दोघींनाही बाहेर काढले व तातडीने खासगी वाहनाद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रासवे यांनी त्या दोघींना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सायंकाळी विच्छेदनानंतर दोन्ही मैत्रिणींचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत गायत्री घुटे, राधिका वटाणे व वाचलेली चैतन्या गायकवाड या तिघीही सारसाळेजवळच असलेल्या करंजखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीत शिकत होत्या. सारसाळे येथे चौथीपर्यंत वर्ग असल्याने त्या दोन वर्षांपासून करंजखेड येथे पायी येत शिक्षण घेत होत्या. मृत दोघीही अभ्यासात हुशार असल्याचे वर्गशिक्षक राजेंद्र कापसे यांनी सांगितले.