इंडियन प्रीमियर लीग अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता नको ते उद्योग सुरु केले आहेत. पाकिस्तान सुपर लीगने थेट आयपीएलशी तुलना करण्यासाठी थेट स्पर्धेत उतरली आहे. असं असताना पीएसएल ड्राफ्टमध्ये निवड झालेल्या एका खेळाडूने आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससोबत करार केल्याने वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असलेल्या कॉर्बिन बॉशला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून कायदेशीर नोटीस मिळाली आहे. जानेवारीमध्ये झालेल्या पीएसएल 2025 च्या ड्राफ्टमध्ये पेशावर झल्मीने 30 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशची डायमंड श्रेणीत निवड केली. पण असं असूनही या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघासोबत करार केला. जखमी लिझाड विल्यम्सच्या जागी मुंबई इंडियन्सने त्याची निवड केली.
कॉर्बिन बॉशने पीएसएलमधून बाहेर पडून त्याच्या कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे. यासाठी त्याला कायदेशीर नोटीस पाठवली असून उत्तर मागितलं आहे. पीसीबीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “कॉर्बिन बॉशला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. त्याला त्याच्या व्यावसायिक आणि करारातील वचनबद्धता मोडण्याचं कारण द्यावं लागणार आहे.’ पीएसएलमधून त्याच्या माघारीचे परिणाम पीसीबी व्यवस्थापनाने आधीच स्पष्ट केले आहेत. त्याचे उत्तर निर्दिष्ट मुदतीत आवश्यक आहे. पीसीबीने सध्या या विषयावर कोणतंही विधान करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तान प्रीमियर लीग आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा एकाच वेळी आयोजित केल्या आहेत. पाकिस्तानची लीग 11 एप्रिलपासून सुरु होईल आणि 18 मे रोजी संपेल. तर आयपीएल 22 मार्चपासून 25 मे पर्यंत असेल. या दोन्ही लीग एकाच वेळी आल्याने विदेशी खेळाडू अडचणीत आले आहेत. कॉर्बिन बॉश त्यांच्या निर्णयाचे समर्थन कसं करेल? की पीसीबी त्याच्यावर कडक कारवाई करेल? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत उघड होतील. पीएसएल-आयपीएलमधील वाढती स्पर्धा यातून अधिक तीव्र होणार आहे. यापूर्वी अनेक विदेशी क्रिकेटपटूंनी पीएसएल करार सोडून आयपीएलमध्ये खेळले आहेत. परंतु यावेळी पीसीबीने थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याचा परिणाम भविष्यात पीएसएलमध्ये खेळू इच्छिणाऱ्या विदेशी खेळाडूंवर होऊ शकतो.