आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील हा सामना 22 मार्चला ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. रहाणेला या स्पर्धेत प्रदीर्घ असा अनुभव आहे. अजिंक्य या 18 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात इतिहास घडवणार आहे. रहाणे पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरताच महारेकॉर्ड करणार आहे. रहाणे अशी कामगिरी करणार आहे जे आतापर्यंत महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यासारख्या अनुभवी कर्णधारांनाही जमलेलं नाही.
अजिंक्य रहाणे मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र त्यानंतर कोलकाताने (KKR) रहाणेला आपल्या गोटात घेतलं. कोलकाताने रहाणेला मेगा ऑक्शनमधील दुसऱ्या दिवशी दीड कोटी या बेस प्राईजमध्ये आपल्या गोटात घेतलं. तर त्यांनतर रहाणेला कोलकाताचं कर्णधारपद देण्यात आलं. त्यानंतर आता रहाणे 22 मार्चला मैदानात उतराच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद होईल.
रहाणे आयपीएलच्या इतिहासात 3 संघांचं नेतृ्त्व करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरणार आहे. आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये 3 संघांचं नेतृत्व केलेलं नाही. रहाणेने याआधी राजस्थान आणि पुणे या 2 संघांचं नेतृत्व केलं आहे.
रहाणेने 2017 साली पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर रहाणेला राजस्थानने कर्णधार केलं. रहाणने दोन्ही संघांसाठी एकूण 25 सामन्यांत नेतृत्व केलं. रहाणेला कर्णधार म्हणून 25 पैकी 9 सामन्यांतच विजय मिळवता आला. तर 16 सामन्यात पराभूत व्हावं लागलं.
दरम्यान आतापर्यंत 3 विदेशी खेळाडूंनी 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व केलं आहे. कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि स्टीव्हन स्मिथ या तिघांनी प्रत्येकी 3-3 संघांचं नेतृत्व केलं आहे. संगकाराने पंजाब, डेक्कन चार्जस आणि हैदराबाद या संघांचं नेतृत्व केलंय. जयवर्धन याने कोच्ची, दिल्ली आणि पंजाबच्या कर्णधारपदाची सूत्र सांभाळली. तर स्टीव्हन स्मिथ याने पुणे वॉरियर्स इंडिया, राजस्थान आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व केलंय.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली आणि लवनीथ सिसोदिया.