2025 चा आयपीएल हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी बरोबर पाच दिवस आधी एका बड्या संघाची विक्री झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गुजरात टायटन्स संघाला नव्या कंपनीनं खरेदी केलं आहे. गुजरातचा प्रसिद्ध ग्रुप असलेल्या टॉरेन्ट ग्रुपने सोमवारी गुजरात टायटन्सच्या अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण केली. गुजरात टायटन्स हा संघ 2021 पासून आयपीएल स्पर्धेचा भाग आहे. तेव्हा या संघाला सीव्हीसी कॅपिटलने 5600 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. त्यांनी 2022 मध्ये ही स्पर्धा देखील जिंकली होती.
टॉरेन्टची किती टक्के भागिदारी?
मिडिया रिपोर्टनुसार टॉरेन्ट ग्रुपकडून सोमवारी फ्रेंचाईजीचं अधिग्रहण पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली, अहमदाबाद स्थित टॉरेन्ट ग्रुपचा समावेश हा भारतातील दिग्गज फार्मा कंपन्यांमध्ये केला जातो. मात्र या कंपनीकडून फ्रेंचाईजीची पूर्ण 100 टक्के भागिदारी खरेदी करण्यात आलेली नाहीये.सीव्हीसी कॅपिटलकडे या संघाची फ्रेंचाइजी होती, आता त्यातील 67 टक्के हिस्सा हा टॉरेन्ट ग्रुपने खरेदी केला असून, फ्रेंचाइजीवर नियंत्रण मिळवलं आहे.
ही डील कितीमध्ये झाली याची माहिती अजून समोर आलेली नाहीये, मात्र एका रिपोर्टनुसार सध्या या संघाची किंमत 7500 कोटी रुपये इतकी असून, टॉरेन्टने यासाठी तब्बल 5025 कोटी रुपये मोजून या संघाची 67 टक्के भागेदारी खरेदी केली आहे. आता सीव्हीसी कॅपिटलकडे या संघाचा केवळ 33 टक्के हिस्सा उरला आहे. तर टॉरेन्टने 67 टक्के हिस्सा मिळाला आहे.
आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा संघ
सीव्हीसी कॅपिटल्सकडून 2021 मध्ये बीसीसीआयच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ई-ऑक्शन मध्ये या संघावर सर्वात मोठी बोली लावण्यात आली होती. तेव्हा या कंपनीने तब्बल 5625 कोटी रुपयांमध्ये हा संघ खरेदी केला होता. आयपीएल इतिहासामधील हा दुसरा सर्वात मोठा सौदा होता. लखनऊच्या संघासाठी गोयनंका ग्रुपने यापेक्षा अधिक बोली लावली होती. या संघाची खरेदी 7 हजार कोटी रुपयांना करण्यात आली होती.