आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. एकूण 10 संघ, सपोर्ट स्टाफ आणि असंख्य क्रिकेट चाहते या हंगामासाठी उत्सूक आणि सज्ज आहेत. सनरायजर्स हैदराबाद टीमने टीम इंडियाचा विस्फोटक विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला 11 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. इशान किशन याने 18 व्या मोसमाआधी स्फोटक खेळी करुन टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य ठरवलाय, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. ईशानने या हंगामाआधीच बॅटिंगने हंगामा केला आहे. हैदराबाद टीम राजीव गांधी स्टेडियममध्ये सराव करत आहे. याच स्टेडियममध्ये सरावाच्या दृष्टीने हैदराबाद संघातील खेळाडूंमध्ये आपआपसात सामने खेळवण्यात येत आहेत. ईशानने या 2 सराव सामन्यात धमाका केला.
ईशानने दोन्ही सामन्यांत एकूण 42 बॉलमध्ये 113 धावा केल्या. ईशानने पहिल्या सामन्यात 23 चेंडूत 64 धावा केल्या. तसेच आज (मंगळवारी 18 मार्च) 19 बॉलमध्ये 49 रन्स केल्या. ईशानने या खेळीसह आपण 18 व्या मोसमासाठी सज्ज असल्याचं एकाप्रकारे जाहीर केलं आहे. हैदराबाद टीममध्ये अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन यासारखे विस्फोटक फलंदाज आहेत. त्यात आता ईशान किशनही आहे. त्यामुळे हैदराबाद टीम 300 पार मजल मारु शकते.
हैदराबादच्या फलंदाजांनी 17 व्या मोसमात धुमधडाका केला होता. हैदराबादने गत मोसमात 20 षटकांमध्ये 287 धावा केल्या. हैदराबादने बंगळुरुविरुद्धच्या या सामन्यात एकूण 22 षटकार लगावले होते. तेव्हा हेडने 41 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी केली. तसेच हेन्रिक क्लासेन याने 31 बॉलमध्ये 67 रन्स केल्या होत्या. तसेच अब्दुल समद याने 10 चेंडूत 37 धावांची भर घातली होती. आता या हंगामापासून ईशान किशन हैदराबादसाठी खेळणार आहे. त्यामुळे हैदराबादच्या बॅटिंगला आणखी बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे हैदराबाद आयपीएलमध्ये एका डावात किती धावा करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
हैदराबादच्या फक्त 2 फलंदाजांनीच गेल्या हंगामात एकूण 74 षटकार लगावले होते. भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने 42 सिक्स खेचले होते. तर ट्रेव्हिस हेड याने 32 षटकार फटकावले होते. त्यामुळे इतर 9 संघांसमोर या दोघांनाही रोखण्याचं आव्हान असणार आहे.
आयपीएल 18 व्या मोसमासाठी सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान किशन, राहुल चाहर, एडम झॅम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंह, जीशान अन्सारी, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि सचिन बेबी.