Sunita Williams : कशी आहे सुनिता विल्यम्सची तब्येत? 10 पॉईंट्समध्ये समजून घ्या अंतराळ ते पृथ्वीपर्यंतचा प्रवास
Sunita Williams and Butch Wilmore Return to Earth : भारताची लेक आणि नासाची अंतराळवीर सुनिता विल्यम्सच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या सर्वांचा जीव आज भांड्यात पडला. नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. गेल्या जूनपासून सुनिता विल्यम्स या इतर अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र काही ना काही कारणांमुळे, समस्यांमुळे त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन लांबणीवर पडत होतं. अखेर आज त्यांना यश मिळालं आणि आज पहाटे त्यांचं पृथ्वीवर लँडिंग झाल्याची खुशखबर नासाने शेअर केली. एलोन मस्कचे स्पेसएक्स आणि नासा यांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले असून त्यामुळे संपूर्ण जगभरात आनंदाचे वातावरण आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून रवाना झाल्यानंतर साधारण 17 तासांनी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटने पृथ्वीवर उतरलं. फ्लोरिडा पॅनहँडलमध्ये टाल्लाहसीच्या किनारपट्टीवर स्प्लॅशडाउन झाला. त्यांच्या यशस्वी लँडिंगनंतर जगभरासह भारतातही आनंदाची लाट पसरली. लँड झाल्यानंतर तासाभरात हे अंतराळवीर त्यांच्या कॅप्सूलमधून बाहेर आले आणि कॅमेऱ्यांसमोर सर्वांना अभिवादन करताना आणि हसताना दिसले. यानंतर त्यांना स्ट्रेचरवर नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र सुनीता विल्यम्स आता कशा आहेत, सर्व अंतराळवीर सुरक्षित आहेत का? त्याच्या तब्येतीबाबत काय अपडेट आहे? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया त्यांच्या अंतराळापासून ते पृथ्वीपर्यंतचा प्रवास..
सुनिता विल्यम्स -बुच विल्मोरचे यशस्वी पुनरागमन
- नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांपूर्वी अंतराळात गेले होते. बोईंगच्या चाचणी उड्डाणात बिघाड झाल्यामुळे हे अंतराळवीर तेव्हापासून अंतराळात अडकले होते. 5 जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर क्रू कॅप्सूलवर प्रक्षेपित झाल्यानंतर ते दोघे एक किंवा दोन आठवड्यांत परत येतील अशी अपेक्षा होती. परंतु अंतराळ स्थानकाच्या मार्गावर इतक्या अडचणी आल्या की शेवटी NASA ला स्टारलाइनर रिकामे परत पाठवावे लागले आणि चाचणी वैमानिकांना SpaceX मध्ये स्थानांतरित करावे लागले, त्यांना फेब्रुवारीमध्ये घरी परतण्याची परवानगी दिली. यानंतर, स्पेसएक्स कॅप्सूलमध्ये समस्यांमुळे आणखी एक महिन्याचा विलंब झाला.
- मात्र त्यानंतर कधी-कधी असं वाटत होतं की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर कधीच परत येऊ शकणार नाहीत, सगळ्यांच्या मनात शंका होती. त्या दोघांना पृथ्वीवर परत आणण्याची मोहीम अनेक वेळा पुढे ढकलावी लागली. अशा परिस्थितीत अनेकांची धाकधूक वाढली. मात्र अखेर 9 महिन्यांनंतर ते सर्व सुखरूप घरी परतले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर आणण्यासाठी, NASA आणि SpaceX ने Falcon 9 रॉकेट वापरून 13 मार्च रोजी क्रू-10 मोहीम सुरू केली. SpaceX चे ड्रॅगन अंतराळयान Falcon-9 रॉकेट शुक्रवारी संध्याकाळी (स्थानिक वेळेनुसार) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले. याच मिशनअंतर्गत दोघेही मायदेशी परतले.
- खरंतर, NASA-SpaceX च्या क्रू-10 मिशनने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर उपस्थित क्रू-9 ची जागा घेतली. NASA आणि SpaceX ने Falcon 9 रॉकेटद्वारे सुरू केलेल्या क्रू-10 मिशनमध्ये चार नवीन अंतराळवीर अंतराळयानात गेले. त्या चौघांनी सुनिता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर दोघांची जागा घेतली.
- अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांनी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून केवळ आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) उड्डाण केलं होतं, पण स्टारलायनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते पृथ्वीवर परतू शकले नाहीत. आता 9 महिन्यांनी त्यांच्या गृहवापसीनंतर जणू त्यांचा हा दुसरा जन्मच आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
- मात्र त्यांचं लँडिंग कुठे व कसं झालं याचीही अनेकांना उत्सुकता आहे. एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे फ्लोरिडा किनाऱ्याजवळ अंतराळवीरांना उतरवण्यात आले. लँडिंग होताच, जिथे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उतरले, स्पेसएक्स रिकव्हरी टीम त्या ठिकाणी पोहोचली. रिकव्हरी वाहनाद्वारे ते यान बाहेर काढण्यात आलं. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी हे अंतराळवीर फ्लोरिडापासून समुद्रात लँड झाले.
- या यानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत आणखी दोन अंतराळवीरही पृथ्वीवर उतरले आहेत. अंतराळवीरांना ड्रॅगन अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. ड्रॅगन फ्रीडमला कॅप्सूल हे पाण्यातून बाहेर काढून रिकव्हरी व्हेसलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या पथकाने अंतराळवीरांची कसून आरोग्य तपासणी केली. सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर सुरक्षित आणि पूर्णपणे ठीक आहेत, अशी माहिती नासातर्फ देण्यात आली.
- सुनीता विल्यम्स दीर्घकाळानंतर या अवकाशातून पृथ्वीवर परतल्या आहेत. अशा स्थितीत अंतराळात असलेल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या शरीरातील स्नायू आणि हाडे कमकुवत झालेली असू शकतात. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल. त्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वाटावे यासाठी प्रथम डॉक्टरांची एक टीम त्यांच्या आरोग्याची कसून तपासणी करेल. त्यांना स्ट्रेचरवर नेण्यात आलं. हृदय, रक्तदाब, दृष्टी, स्नायूंची स्थिती, सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. तसेच त्यांनी मानसिक स्थिती कशी आहे याचीही तपासणी होईल, तोपर्यंत त्यांना कोणालाही भेटता येणार नाही.
- सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना भेटण्यासाठी कुटुंबालाही बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. ते अंतराळात असताना त्यांच्या कुटुंबांसाठी हा कठीण काळ होता. अंतराळात अडकून पडल्यामुळे बुच विल्मोर हे हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या त्यांच्या लहान मुलीसोबत राहू शकले नाहीत, तर सुनिता विल्यम्सना फक्त इंटरनेट कॉलद्वारे तिच्या कुटुंबाशी संवाद साधावा लागला होता.
- सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीपर परतल्यावर भारतापासून अमेरिकेत तसेच जगभरातही जल्लोष सुरू आहे. हा भारत आणि संपूर्ण जगासाठी अभिमानाचा, अभिमानाचा आणि दिलासा देणारा क्षण असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केलं. केले. त्याच्या सुरक्षित परतीसाठी अमेरिकेतील 21 हिंदू मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात आली. विल्यम्सचा भारतीय आणि स्लोवेनियन वारसा पाहता अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेचे अध्यक्ष तेजल शाह यांनी सांगित नमूद केलं. तसेच बुच विल्मोर यांच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली होती.